मुंबई व कोकणात 24 ते 27 जुलैदरम्यान उंच लाटांसह मुसळधार पावसाचा इशारा; नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी रेड व ऑरेंज अलर्ट. समुद्रकिनारी जाण्यास बंदी, नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
सायली मेमाणे
पुणे २४ जुलै २०२५ : मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून २४ ते २७ जुलैदरम्यान कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः २६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईत ४.६७ मीटर उंच भरती येणार आहे. त्यामुळे पालिकेने समुद्र किनारी जाण्यावर बंदी घातली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई व उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा आहे. २६ जुलै रोजी येणाऱ्या उंच भरतीमुळे समुद्र, खाडी, व जलाशयाजवळ जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, NDRF आणि BMC यांचे पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. नागरिकांना समुद्रकिनारी फिरकू नका, घराबाहेर गरज असल्याशिवाय जाऊ नका, सखल भागात राहत असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, वाहतुकीसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि मोबाइलमध्ये हवामान अलर्ट सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हवामानाच्या पार्श्वभूमीवर काही भागांतील शाळा आणि खाजगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालक आणि कर्मचारी यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे. प्रशासनाकडून ही परिस्थिती गंभीर मानली जात असून नागरिकांनी आपले व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. २६ जुलै रोजी होणारी प्रचंड भरती आणि मुसळधार पाऊस मुंबई व कोकणासाठी संकट निर्माण करू शकतो, त्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगावी.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter