मुंबईत आग लागल्यावर वेळेवर पोहोचू न शकणाऱ्या अग्निशमन गाड्यांमुळे जीवितहानी होऊ शकते. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट निर्देश दिले की अडथळा करणाऱ्या वाहनधारकांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली जाईल.
सायली मेमाणे
पुणे २४ जुलै २०२५ : अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई; आयुक्त भूषण गगराणी यांचा कडक इशारा.
मुंबईत सतत वाढत चाललेली आग लागण्याच्या घटना, दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आपत्कालीन सेवेचा कार्यक्षमतेत अडथळा येत आहे. विशेषतः अग्निशमन दलाच्या गाड्यांना अपघातस्थळी पोहोचण्यास होणाऱ्या विलंबामुळे अनेकदा ‘गोल्डन अवर’ वाया जातो. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी कडक निर्देश दिले असून, अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांच्या मालकांविरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली जाणार आहे.
मुंबईतील भायखळा येथील महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या विविध योजना, प्रकल्प आणि सुरक्षा उपायांबाबत ही आढावा बैठक होती. गगराणी यांनी स्पष्टपणे सांगितले की अरुंद रस्त्यांवर गैरप्रकाराने उभ्या केलेल्या वाहनांमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो आणि भविष्यात अशा चालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी गंभीर प्रश्न बनली आहे. अशा परिस्थितीत आगीच्या घटनांमध्ये मदत कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. अग्निशमन दलाचे अधिकारी सांगतात की अग्निशमन गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक वेळ वाया जातो कारण पहिले अडथळे म्हणजेच रस्त्यावर पार्क केलेली वाहने हटवावी लागतात.
या पार्श्वभूमीवर गगराणी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की अशी अडथळा करणारी वाहने फक्त हटवायची नाहीत, तर संबंधित मालकांविरोधात कायदेशीर कारवाई देखील करावी. मुंबई महापालिकेने यापूर्वी लहान अग्निशमन वाहने आणि जलद प्रतिसाद यंत्रणा तयार केली होती, परंतु मोठ्या आगीच्या प्रसंगी मोठ्या वाहनांची आवश्यकता असते.
त्याचबरोबर आयुक्तांनी सुचवले की शहरातील बेवारस वाहने, भंगार, टाकाऊ साहित्य तत्काळ हटवले जावे. विशेषतः रेल्वे स्थानक परिसर आणि गर्दीच्या भागांमध्ये फेरीवाल्यांना हटवण्यासाठी वॉर्ड कार्यालयाबाहेरील कर्मचारी विशेष मोहिमा राबवतील.
मुंबईतील सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन सेवेचा वेग राखण्यासाठी पालिकेने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, नागरिकांनी देखील जबाबदारीने वाहने उभी करावीत आणि प्रशासनाला सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter