गुंजवणी धरण परिसरातील दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. ‘दैनिक लोकमत’च्या बातमीनंतर जलसंपदा विभागाने बोट सेवा सुरू केली असून, आता विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सायली मेमाणे
पुणे २४ जुलै २०२५ : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरण परिसरातील गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती आणि धनगर वस्ती येथील दहा विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. शाळा सुरू झाल्यापासून रस्ता नसल्यामुळे शाळेत जाता न आल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले होते.
जलसंपदा विभागाने तत्काळ धरणात बोट सेवा सुरू केली आहे. ही बोट सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, गावकऱ्यांनाही दळणवळणाची सोय झाली आहे.
निवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयात शिकणारे हे विद्यार्थी दरवर्षी बोटीच्या आधारे शाळेत जात होते. मात्र, यावर्षी १६ जूनपासून बोटच बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
संबंधित रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, टेंडरच्या अटींनुसार ठेकेदाराने बोट चालवणे बंधनकारक होते. तरीही प्रशासन आणि ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत होते. ग्रामस्थांनी निवेदने देऊनही याकडे कोणी लक्ष दिले नाही. अखेर, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर बोट सुरू करण्यात आली.
सरपंच सुनिता खुटेकर यांनी ‘दैनिक लोकमत’चे विशेष आभार मानले आहेत. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे, तर शेतकरी आणि आरोग्य सेवा यांच्यासाठीही आवश्यक असलेली दळणवळणाची सुविधा पुन्हा सुरू झाली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter