पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मोशी येथे उभारले जाणारे ७०० खाटांचे हॉस्पिटल ₹३४०.६७ कोटी खर्चून उभारले जात असून, तिसऱ्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील ७०० खाटांच्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम वेगाने सुरू असून, सध्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या बांधकामाची कामे पूर्ण झाली आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश सार्वजनिक आरोग्य प्रणाली मजबूत करणे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयावरील वाढलेला ताण कमी करणे आहे.
या प्रकल्पासाठी १६ एकर क्षेत्रफळ राखीव ठेवण्यात आले असून, एकूण ₹३४०.६७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रुग्णालयाचे एकूण बांधकाम क्षेत्र ५७,४५० चौरस मीटर असून, बेसमेंटसह आठ मजली हा संपूर्ण आरोग्य संकुल आधुनिक सुविधांनी सज्ज असेल.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “हे रुग्णालय हा परिसरातील सर्वात महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य प्रकल्प आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल आणि एक आधुनिक व पर्यावरणपूरक आरोग्य सुविधा शहराला मिळणार आहे.”
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्खनन आणि बेसमेंटचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि सध्या हे काम वेळेत सुरू आहे.
अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे म्हणाले, “मोशी हॉस्पिटल प्रकल्पाच्या प्रगतीवर आम्ही सातत्यानं लक्ष ठेवून आहोत. सध्या कामाचा वेग समाधानकारक आहे आणि गुणवत्तेचा व सुरक्षिततेचा संपूर्ण विचार करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.”
हे रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर पुणे महानगर क्षेत्रातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांपैकी एक ठरणार आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभसे यांनी सांगितले की, “तिसऱ्या मजल्यापर्यंतची स्ट्रक्चरल कामे मंजूर वेळापत्रकानुसार पूर्ण झाली आहेत. आम्ही या इमारतीमध्ये प्न्युमॅटिक ट्यूब सिस्टीम, पीएसए ऑक्सिजन जनरेटरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आहोत आणि ग्रीन सर्टिफिकेशन मानदंडांची पूर्तता करण्यावर भर दिला आहे.”
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter