• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पिंपरी-चिंचवडमध्ये ३४ हजार मालमत्ताधारकांकडून एकदाही मालमत्ता कर नाही! महापालिकेची जप्ती कारवाई

Jul 25, 2025
पिंपरी चिंचवडमध्ये ३४ हजार मालमत्ताधारक कर थकबाकीदार, महापालिकेची जप्ती मोहीम पिंपरी चिंचवडमध्ये ३४ हजार मालमत्ताधारक कर थकबाकीदार, महापालिकेची जप्ती मोहीम

पिंपरी-चिंचवडमधील ३४ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी एकदाही कर भरलेला नाही. महापालिकेने आता त्यांच्या मोटार, टीव्ही, फ्रिजसारख्या जंगम मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरल्यास मिळणार ४% सवलत.

सायली मेमाणे

पिंपरी चिंचवड,२५ जुलै २०२५ : – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. शहरात एकूण ७.३१ लाख नोंदणीकृत मालमत्तांपैकी तब्बल ३४ हजार २२ मालमत्ताधारकांनी एकदाही महापालिकेचा मालमत्ता कर भरलेला नाही, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या थकबाकीदारांवर महापालिकेकडून जंगम मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

महापालिकेच्या कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४.२६ लाख मालमत्ताधारकांनी चालू आर्थिक वर्षातील कराचा भरणा केला आहे. मात्र काही हजार नागरिकांनी वर्षानुवर्षे मालमत्ता कर भरलेला नाही. यापैकी अनेकांनी ५ ते १० वर्षांहून अधिक काळ थकबाकी ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या थकबाकीदारांकडे असलेल्या मोटारगाड्या, टीव्ही, फ्रिजसारख्या जंगम व महागड्या वस्तू जप्त करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

सध्या शहरातील एक लाख १२ हजार ८०९ निवासी मालमत्ताधारकांकडे एकूण ३१० कोटी रुपयांचा कर थकित आहे. यापैकी २८ हजार ५१८ मालमत्तांवर ५० हजारांहून अधिक, ९१४७ मालमत्तांवर एक लाखांहून अधिक तर ८७५ व्यावसायिक मालमत्तांवर तब्बल पाच लाखांहून अधिक थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना पूर्वसूचना देण्यात आली असून, तरीही प्रतिसाद न दिल्यास मालमत्ता जप्त करण्याची कारवाई होणार असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेचा मुख्य उद्देश कर संकलन वाढवणे हा आहे. चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेने १३०० कोटी रुपयांचे कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून, पहिल्या तिमाहीत ५२२ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी शहरातील १८ विभागीय कार्यालयांमार्फत अभियान राबवले जात आहे.

ज्या थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा केलेला नाही, त्यांच्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी तातडीने ऑनलाइन पेमेंट करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने शहर स्वच्छता, रस्ते विकास, पाणीपुरवठा व इतर नागरी सेवांसाठी निधी खर्च करते. नागरिकांनी नियमित कर भरल्यास या सेवा अधिक सक्षमपणे दिल्या जातील. मात्र, कर न भरणाऱ्यांविरोधात आता महापालिका कठोर भुमिका घेणार असून, जप्तीची कारवाई अटळ असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

संपूर्ण शहरात मालमत्ता कराबाबत जागरुकता निर्माण करून अधिकाधिक नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. येत्या काळात मालमत्ता कर भरणा न करणाऱ्यांवर आणखी कडक पावले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune