पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याबाहेर डेटा चोरीच्या आरोपांमुळे चौकशीसाठी आलेल्या नाशिकच्या चार तरुणांवर जीवघेणा हल्ला. जुन्या कंपनीच्या पूर्वकर्मचाऱ्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, जुन्या कंपनीने डेटा चोरीचा आरोप केल्यानंतर चौकशीसाठी आलेल्या चार तरुणांवर पोलीस ठाण्याच्या बाहेरच प्राणघातक हल्ला झाला आहे. नाशिकहून आलेले हे तरुण चौकशीनंतर आपल्या घरी परत जात असताना, कोथरूडमधील साई प्रतिष्ठान चौक येथे रात्रीच्या सुमारास हा गंभीर हल्ला झाला. या घटनेने पुन्हा एकदा कंपनीमधील वैयक्तिक वाद आणि माहिती सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
संदीप कैलास लवाटे (वय 28, रा. गणेशनगर, मनमाड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सध्या नाशिकमधील एका कंपनीत काम करत असून, पूर्वी कोथरूड येथील एका कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या बरोबर योगेश दुसाणे, प्रवीण गायकवाड आणि सचिन केदार हे तिघेही होते. मार्च 2025 मध्ये त्यांनी ती कंपनी सोडली आणि नवीन कंपनीत रुजू झाले. दरम्यान, त्यांच्या जुन्या कंपनीने डेटा चोरीबाबत तक्रार दिली होती आणि त्याच्या चौकशीसाठी 21 जुलै रोजी ते कोथरूड पोलीस ठाण्यात आले होते.
चौकशीदरम्यान दोन्ही पक्ष समोरासमोर आले आणि वाद मिटल्याचे सांगण्यात आले. परंतु, चौकशी संपून परतत असताना साई प्रतिष्ठान चौकात एका दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली आणि लगेचच एक व्यक्तीने योगेश दुसाणे यांना ओढून बाहेर काढून मारहाण केली. दुसऱ्या व्यक्तीने संदीप लवाटे यांना कारमधून बाहेर काढून धारदार शस्त्राने डोक्यावर वार केला. लोखंडी हत्याराने दुसाणे यांनाही मारहाण करण्यात आली. सचिन केदार आणि प्रवीण गायकवाड यांनाही मारहाण झाली. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, एक आरोपी संदीप लवाटे यांनी ओळखल्याचे पोलिसांना सांगितले आहे आणि तो पूर्वी त्यांच्याच कंपनीत काम करत होता, असेही त्यांनी नमूद केले आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कर्मचारी व कंपनी यांच्यातील तणावाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि डेटा सुरक्षेसंबंधी कायदेशीर प्रक्रिया आणि संरक्षण यंत्रणा यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter