यवतमाळ जिल्ह्यात पुसद येथे पुसद पोलिसांनी ४० लाखांहून अधिक किमतीची विदेशी दारू जप्त केली. विशेष बाब म्हणजे या ट्रकवर एका राज्य मंत्र्यांचे नाव लिहिलेले होते. सात आरोपी अटकेत, तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : क्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्यांचे नाव दिसल्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज्यात दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी असतानाही काही मंडळी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची तस्करी करत असल्याचे हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात मोहागाव रस्त्यावर पुसद पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४० लाखांहून अधिक किमतीची ग्रीन लेबल व्हिस्की जप्त केली आहे. ही कारवाई करताना पुसद पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, ट्रकसह मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ट्रकवर राज्याच्या एका महिला राज्यमंत्र्यांचे नाव छापलेले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रक क्रमांक MH 12 YB 0048 या वाहनातून ग्रीन लेबल व्हिस्कीच्या एकूण १८,२८८ बाटल्या (प्रत्येकी १८० मिली) सापडल्या. या व्यतिरिक्त सात मोबाईल फोन, तीन दुचाकी आणि ट्रक असा मिळून एकूण ६४ लाख ७२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – मनीष ईश्वर सुरूळे (१९), प्रवीण दत्ता जिजोरे (३०), रामेश्वर मधुकर पवार (२४), सचिन उद्धल चव्हाण (२३), सतीष श्रावण चव्हाण (२४), गोकूळ बाबुसिंग चव्हाण (२३) आणि विक्रम बळीराम जाधव (२०). या सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहागाव मार्गावर दुचाकीस्वारांना ट्रकमधून दारूच्या पेट्या विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जमादार पंकज पातूरकर यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि ठाणेदार सदानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या ट्रकवर राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नाव मोठ्या अक्षरात लिहिले असल्याचे उघडकीस आल्यामुळे संशय अधिकच बळावला आहे. हा ट्रक नेमका कोणाच्या मालकीचा आहे आणि मंत्र्यांचे नाव त्यावर का लिहिले गेले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, मंत्री महोदयांच्या नावाचा वापर या तस्करीसाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. हा प्रकार केवळ दारू तस्करीपुरता मर्यादित न राहता, राजकीय संदर्भामुळे त्याचे स्वरूप अधिकच गहन झाले आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन यांना पारदर्शक चौकशी करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter