• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

वसई विरार महापालिकेचा धक्कादायक निर्णय: स्मशानभूमीत बालउद्यानाची निर्मिती, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Jul 25, 2025
वसई विरार महापालिकेचा धक्कादायक निर्णय: स्मशानभूमीत बालउद्यान आणि झोपाळे बसवलेवसई विरार महापालिकेचा धक्कादायक निर्णय: स्मशानभूमीत बालउद्यान आणि झोपाळे बसवले

वसई विरार महापालिकेने स्मशानभूमीत झोपाळे आणि खेळण्याचे साहित्य बसवून नागरिकांच्या भावना दुखावल्या. या असंवेदनशील निर्णयामुळे संतापाची लाट पसरली आहे.

सायली मेमाणे

पुणे २५ जुलै २०२५ : वसई विरार महापालिकेचा धक्कादायक निर्णय: स्मशानभूमीत बालउद्यानाची निर्मिती, नागरिकांमध्ये संतापाची लाट

वसई विरार महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. कारण, महापालिकेच्या उद्यान विभागाने वसईतील एका हिंदू स्मशानभूमीत चक्क खेळण्याचे आणि व्यायामाचे साहित्य बसवले आहे. झोपाळे, घसरगुंडी, आणि इतर तब्बल १५ पेक्षा अधिक साहित्य लावण्यात आले असून, या कृतीवरून महापालिकेचा नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्मशानभूमीसारख्या शोकस्थळी अशा प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य बसवणे म्हणजे नागरिकांच्या भावना दुखावण्यासारखे आहे, असे मत अनेक स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

वसई पश्चिमेतील बेणापट्टी भागात असलेली ही स्मशानभूमी प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येते. येथील अंत्यविधी दररोज पार पडतात. अशा गंभीर आणि भावनिक वातावरणात लहान मुले खेळावीत असा विचित्र निर्णय महापालिकेने घेतल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. स्मशानात बालउद्यान उभारणे म्हणजे त्या जागेची आणि तेथे येणाऱ्या शोकमग्न कुटुंबीयांची थट्टा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो – वसई विरार महापालिकेचा कारभार नक्की कुणाच्या देखरेखीखाली आणि कोणत्या तत्त्वांवर चालतो आहे? मागील ५ वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्याने लोकप्रतिनिधींचा सहभागच नाही. त्यामुळे अधिकारी मनमानी निर्णय घेतात आणि जनतेच्या भावनांचा विचार केला जात नाही. नियोजन न करता फक्त निधी खर्च करण्यासाठी अशी कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

याप्रकरणी पालिकेच्या उपायुक्त (उद्यान) स्वाती देशपांडे यांनी चुकीची कबुली दिली असून, “ही चूक असून योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच लावलेले साहित्य लवकरच काढण्यात येईल,” असे आश्वासन दिले आहे. परंतु, पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांनी मात्र बेजबाबदारपणे उत्तर देत, “सर्व ठिकाणी साहित्य लावले जाते, माहिती पाहिजे असेल तर कार्यालयात या,” असे रुक्ष उत्तर दिले. यावरून पालिकेच्या यंत्रणेतील संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा अभाव स्पष्ट होतो.

या संपूर्ण प्रकरणावर माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “स्मशानभूमी ही शोक व्यक्त करण्याची जागा आहे. तिथे लहान मुलांसाठी झोपाळे बसवणे म्हणजे दु:खाच्या जागेला विनोदाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. ही केवळ पैशांची उधळपट्टीच नव्हे तर भ्रष्टाचाराचेही लक्षण आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, स्मशानात बालउद्यान बसवणे ही मानवी मूल्यांची आणि भारतीय संस्कृतीची थट्टा आहे.

नागरिकांचा रोष योग्य असून, पालिकेने यास तत्काळ दखल घ्यायला हवी. अशा निर्णयांमुळे लोकांचा प्रशासनावरचा विश्वास उडत जातो. अशा गंभीर जागांवर कोणतेही विकासकाम करण्यापूर्वी स्थानिकांची मत जाणून घेणे आणि संवेदनशीलता राखणे ही किमान जबाबदारी प्रशासनाने घ्यायला हवी. अन्यथा अशा निर्णयांना कायम विरोध होत राहील आणि पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहतील.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune