कोकण रेल्वे भारतातील पहिली कार फेरी ट्रेन कोलाड ते वेरणा सुरू करत आहे. गणेशोत्सवाआधी सुरू होणारी ही सेवा फक्त १२ तासांत प्रवास पूर्ण करणार असून, कारसह प्रवास अधिक सोपा आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : मुंबईहून गोव्याकडे कारसह प्रवास आता सोपा; गणेशोत्सवापूर्वी देशातील पहिली फेरी ट्रेन सुरू
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंददायक बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड (KRCL) भारतात प्रथमच खासगी वाहनांसाठी ‘फेरी ट्रेन’ सेवा सुरू करत आहे. या सुविधेमुळे कोलाड (महाराष्ट्र) येथून वेरणा (गोवा) पर्यंत नागरिक आपली कार रेल्वेमार्गे पाठवू शकतील आणि स्वतः प्रवासी डब्यातून सोयीस्कर प्रवास करू शकतील.
सध्याच्या घडीला मुंबई किंवा पुण्याहून गोव्याकडे कारने प्रवास करताना सुमारे २० ते २२ तासांचा कालावधी लागतो. यामध्ये घाट मार्ग, वाहतूक कोंडी आणि थकवणारा प्रवास यामुळे प्रवाशांचा वेळ आणि ऊर्जा खर्ची पडते. मात्र आता ही नविन फेरी ट्रेन सेवा केवळ १२ तासांमध्ये प्रवास पूर्ण करेल. त्यामुळे वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक पर्याय प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
कोकण रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासकरून गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. अशा वेळी रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी करणे हे या सेवेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. या नव्या ट्रेनमध्ये पूर्वी ट्रक वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे डबे आता खासगी कार वाहतुकीसाठी सज्ज केले आहेत.
या गाडीत एकूण २० वॅगन असतील आणि प्रत्येकी वॅगनमध्ये २ कार ठेवता येतील. त्यामुळे एकावेळी ४० कार घेऊन ट्रेन प्रवास करू शकते. मात्र ही गाडी किमान १६ कार्स बुक झाल्यानंतरच चालवण्यात येणार आहे. प्रवासासाठी वेळापत्रक ठरवण्यात आले असून, ही गाडी संध्याकाळी ५ वाजता कोलाड येथून सुटेल आणि पहाटे ५ वाजता वेरणा, गोवा येथे पोहोचेल. कार लोडिंगसाठी दुपारी २ वाजता कोलाड येथे रिपोर्टिंग अनिवार्य आहे.
यात्रेच्या दरामध्ये, ३AC कोचसाठी ₹९३५ तर दुसऱ्या श्रेणीतील (SLR) सीटसाठी ₹१९० इतका भाडा लागेल. एका कारमधून ३ प्रवासी प्रवास करू शकतात, त्यापैकी २ जण ३AC मध्ये आणि १ जण SLR कोचमध्ये जाईल. कार वाहतुकीचे शुल्क ₹७,८७५ इतके असेल (एकमार्गी).
ही सेवा केवळ वेळ आणि पैसा वाचवणारी नाही, तर पर्यावरणपूरक सुद्धा आहे. त्यामुळे इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण येईल. उत्सवाच्या गर्दीत, विशेषतः कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या कुटुंबांना हा सेवा एक ‘स्टेस-फ्री’ अनुभव देईल.
कोकण रेल्वेने सुरू केलेली ही भारतातील पहिली खासगी कार फेरी ट्रेन सेवा एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. ही संकल्पना आता देशातील इतर भागांमध्येही लागू केली जाऊ शकते. रेल्वेच्या माध्यमातून कार घेऊन प्रवास करणं ही कल्पना अनेकांसाठी स्वप्नवत होती, जी आता प्रत्यक्षात उतरते आहे.
या सुविधेमुळे कार चालकांना गाडी चालवण्याच्या थकव्यापासून मुक्ती मिळणार आहे, तर त्याचवेळी त्यांचे स्वतःचे वाहन गोव्यात वापरण्यास मिळणार आहे. ही सुविधा गणेशोत्सवाच्या आधीच सुरू करण्यात येणार असल्याने कोकणात जाणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter