• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

अमृता फडणवीस बदनामी प्रकरणात मोठी कारवाई: भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Jul 25, 2025
अमृता फडणवीस बदनामीप्रकरणात मोठी अपडेट – भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलाअमृता फडणवीस बदनामीप्रकरणात मोठी अपडेट – भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

अमृता फडणवीस बदनामी प्रकरणात न्यायालयाने भूमिश सावे व अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल; चौघांना अटक, दोघे फरार.

सायली मेमाणे

पुणे २५ जुलै २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आल्याच्या प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला असून, न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार असले तरी दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी निखिल संकपाळ याला नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी दत्ता चौधरी, बळिराम ऊर्फ अमित पंडित, आशिष वानखेडे आणि शैलेश वर्मा या चौघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने सशर्त नियमित जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, भूमिश सावे आणि अभिजित फडणीस हे दोघे सध्या फरार आहेत आणि त्यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षाचे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया आणि अमृता फडणवीस यांचे वकील अॅड. एस. के. जैन यांनी अटकपूर्व जामिनास विरोध केला. त्यांनी युक्तिवाद केला की, मजकूर केवळ ‘रिपोस्ट’ केल्याचा बचाव असला तरी, आरोपी एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांनी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला.

न्यायालयाने आपल्या निकालात सांगितले की, सोशल मीडियाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे हा गंभीर गुन्हा आहे आणि अशा प्रकारच्या कृतींना न्यायालयीन मुभा दिली जाणार नाही. त्यामुळे या प्रकरणात अटकपूर्व जामीन देणे योग्य ठरणार नाही.

हे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले असून, सोशल मीडियावरील जबाबदारी आणि कायद्याच्या चौकटीतील अभिव्यक्ती यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune