वाकडमधील स्विगी इंस्टामार्ट स्टोअरमधून ग्राहकाला उंदरांनी कुरतडलेले ओट्स पॅकेट मिळाल्याची तक्रार; यापूर्वीही एक्सपायर दूधाचा अनुभव. तक्रार FDAकडे दाखल.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : वाकड परिसरातील एका रहिवाशाने अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत गंभीर तक्रार नोंदवत स्विगी इंस्टामार्टविरोधात आवाज उठवला आहे. ग्राहकाने ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर त्यांना उंदरांनी कुरतडलेले ओट्सचे पॅकेट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर ग्राहकाने वाकड येथील स्विगी इंस्टामार्ट आउटलेटवरून ओट्स मागवले होते. परंतु, डिलिव्हरीनंतर त्यांना लक्षात आले की ओट्सचे पॅकेट उंदरांनी कुरतडलेले होते. “हे अन्नपदार्थ खाण्यायोग्य नाहीत. अशा वस्तू ग्राहकांना पाठवणे म्हणजे अन्न सुरक्षा नियमांचा भंग आहे,” असे म्हणत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणात संबंधित व्यक्तीने याआधी देखील त्या इंस्टामार्ट स्टोअरविरोधात अनुभव मांडला. “पूर्वी मला तेथून एक्सपायर झालेली दूधाची पॅकेटे मिळाली होती. मी स्वतः जाऊन ती बदलून घेतली, परंतु त्यावेळी मी तक्रार नोंदवली नव्हती,” अशीही माहिती त्यांनी दिली.
या घटनेची तक्रार आता अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृतपणे दाखल करण्यात आली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचे हे प्रकार गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, असे मत सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केले आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर अद्याप स्विगी किंवा संबंधित इंस्टामार्टकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र अशा घटनांमुळे ग्राहकांचा ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.
स्विगी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील ब्रँडला गुणवत्ता नियंत्रण आणि स्वच्छता याबाबत अधिक जबाबदारीने वागावे लागेल. ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्यांच्या सेवेचा केंद्रबिंदू असायला हवा.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter