• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पुरंदर विमानतळ प्रकल्प: अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच प्रकल्प राबवणार

Jul 26, 2025
पुरंदर विमानतळ प्रकल्प: अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच प्रकल्प राबवणारपुरंदर विमानतळ प्रकल्प: अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच प्रकल्प राबवणार

अजित पवार यांनी पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकल्पातून कोणाचेही नुकसान होणार नाही, मोबदला व पुनर्वसन दिले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सायली मेमाणे

पुणे २६ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील पुरंदर तालुक्यात नवे विमानतळ उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळत असली तरी काही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदरमधील सासवडजवळील जागा विमानतळासाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे ठरले आहे. पुण्याजवळ यासारखी दुसरी जागा सध्या तरी उपलब्ध नाही. सध्या घेतल्या जाणाऱ्या क्षेत्रात एकही संपूर्ण गाव समाविष्ट नाही, तर पूर्वी ज्या गावांचा विचार करण्यात आला होता त्यातील काही क्षेत्रही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसमज होऊ नये आणि कोणालाही नाराज न करता त्यांच्या सहमतीनेच प्रकल्प पुढे नेण्यात येईल.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल आणि त्यांचे पुनर्वसन त्याच भागात करण्यात येईल. विमानतळामुळे उध्वस्त होणाऱ्या घरांची पुनर्बांधणी केली जाईल आणि शेतकऱ्यांना इतरत्र शेती करण्याची संधीही दिली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) धोरणानुसार या प्रक्रियेस दिशा दिली जात आहे.

अजित पवारांनी हेही सांगितले की, पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या वाढत्या गरजांमुळे एक स्वतंत्र, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय धावपट्टी असलेले विमानतळ अत्यावश्यक बनले आहे. विद्यमान लोहगाव विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे तेथे विस्तार शक्य नाही. अशा स्थितीत पुरंदर हेच एकमेव व्यवहार्य पर्याय आहे.

शेतकऱ्यांबाबत साशंकता निर्माण न होता सकारात्मक संवादातून हा प्रकल्प राबवला जाईल, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. विमानतळ हा केवळ विकासाचा प्रकल्प नसून स्थानिकांच्या हितासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune