• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

कृत्रिम फुलांवरील बंदीचा फटका: गणेशोत्सवात व्यापारी आणि भक्त संकटात

Jul 26, 2025
कृत्रिम फुलांवरील बंदीचा फटका: व्यवसाय, भक्तगण आणि पर्यावरण यांच्यात तिढाकृत्रिम फुलांवरील बंदीचा फटका: व्यवसाय, भक्तगण आणि पर्यावरण यांच्यात तिढा

महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घातली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांवर आणि गणेशभक्तांवर परिणाम झाला आहे. पर्यावरणीय दृष्टीने निर्णय योग्य का?

सायली मेमाणे

पुणे २६ जुलै २०२५ : राज्य शासनाने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घातल्याची घोषणा केल्यानंतर बाजारात खळबळ उडाली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्यामुळे कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेले व्यापारी अडचणीत आले आहेत. यामुळे सजावट साहित्य विक्रेत्यांची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव हा कोकण आणि महाराष्ट्रात अत्यंत साजरा होणारा उत्सव असून, घरगुती आणि सार्वजनिक आरासासाठी प्लास्टिक फुलांची मागणी सातत्याने वाढत होती. याच पार्श्वभूमीवर अनेक व्यापाऱ्यांनी मुंबई, क्रॉफर्ड मार्केटसारख्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुले मागवली होती. मात्र बंदी जाहीर झाल्याने तयार साठा विक्रीस न पडल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

अनेक व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे की, सध्याच्या हंगामासाठी तरी तात्पुरती सवलत द्यावी, जेणेकरून त्यांनी आधीच खरेदी केलेला माल विक्रीस येईल. अन्यथा या वस्तूंचे काय करायचे, याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

प्लास्टिकच्या फुलांमुळे खऱ्या फुलांची बाजारपेठ संकुचित झाली होती. प्लास्टिक फुले स्वस्त आणि टिकाऊ असल्याने लोक त्यांच्याकडे जास्त झुकत होते. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. अनेक वर्षांच्या मागणीनंतर सरकारने या बंदीची घोषणा केली असून, यामुळे नैसर्गिक फुलांच्या वापराला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, प्लास्टिक फुलांचा अनिर्बंध वापर थांबल्यास त्यांना योग्य दर मिळेल आणि फुलशेती टिकून राहील. अनेक मंदिरे, विवाह समारंभ, उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकची फुले वापरण्याचे प्रमाण वाढले होते, जे पर्यावरणासाठीही घातक ठरत होते.

गणेशोत्सवात आरास आणि सजावटीला खूप महत्त्व असते. अनेकजण घरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये आरास स्पर्धा घेतात. अशा वेळी प्लास्टिक फुलांचा वापर होतो. मात्र, यंदा बंदीमुळे सजावटसाठी पर्यायांची कमतरता भासत आहे.

प्लास्टिक फुलांव्यतिरिक्त नैसर्गिक, कागदी, कापडी, किंवा रीसायकल्ड साहित्य वापरण्याचे पर्याय सरकारकडून सूचवले जात आहेत. मात्र, या पर्यायांचा पुरवठा अजून व्यवस्थित न झाल्याने गणेशभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune