एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; एनडीए नेत्यांच्या भेटींची शक्यता, चर्चांना उधाण
एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; एनडीए नेत्यांच्या भेटींची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेले असून, एनडीएतील प्रमुख नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आले असून, हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शिंदे यांचा दिल्ली दौरा होत आहे. याआधीही अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी दिल्लीचा दौरा केला होता आणि तेव्हाही त्याच्या भेटींविषयी राजकीय चर्चांना ऊत आला होता. आता पुन्हा ते दिल्लीमध्ये दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्क उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना, रणनीती आणि युतीचे आढावा घेतला जाणार आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या राष्ट्रीय स्वरूपात उभारलेल्या नव्या यंत्रणेला बळ देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
याचबरोबर, शिंदे दिल्ली दौऱ्यात एनडीएतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. या भेटींमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटप, प्रचार धोरण, आणि महाराष्ट्रातील युतीचे भवितव्य या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे काही वरिष्ठ नेते, आमदार आणि खासदार दिल्ली दौऱ्यात सहभागी झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटी फक्त सौजन्यभेटी नसून त्यामागे मोठी रणनीती असण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
या दौऱ्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व भाजप युतीमध्ये अजून अधिक समन्वय वाढणार की काही नवीन राजकीय समीकरणे तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.