पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसची सुरुवात – स्मार्ट प्रवासाचा नवा अध्याय
पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसची सुरुवात – स्मार्ट प्रवासाचा नवा अध्याय
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करणार असून सुरुवातीला हिंजवडी, मगरपट्टा, खराडी या भागांत प्रायोगिक सेवा दिली जाणार आहे.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीला अधिक स्मार्ट आणि आधुनिक बनवण्यासाठी PMPML लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करणार आहे. या बस सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या आयटी पार्क परिसरात म्हणजेच हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. स्विच मोबिलिटीचे एक विशेष पथक पुढील आठवड्यात प्रस्तावित मार्गांची पाहणी करण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या डबल डेकर बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असणार असून त्यात डिजिटल तिकीट प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यांचा बाह्य डिझाइन लंडनमधील रेड बसेसप्रमाणे आकर्षक आणि आधुनिक असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये उच्च दर्जाची सस्पेन्शन सिस्टीम बसवण्यात येणार आहे. प्रत्येक बसमध्ये 70 प्रवाशांसाठी बसण्याची आणि 40 प्रवाशांसाठी उभं राहण्याची सोय असेल. त्यामुळे एकावेळी 100 पेक्षा अधिक प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
या बसेसच्या उंचीची रचना अशी केली जाणार आहे की, त्या पुणे मेट्रो स्टेशन किंवा उड्डाणपुलांखाली सहजपणे धावू शकतील. PMPML च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी एका बसची किंमत सुमारे 2 कोटी रुपये इतकी जास्त आहे, तरी त्या जुन्या डिझेल डबल डेकर बसेसच्या तुलनेत अधिक टिकाऊ आणि देखभाल खर्च कमी असतील. त्यामुळे दीर्घकालीन फायदा अधिक मिळू शकतो.
PMPML ताफ्यात सध्या 1,650 बस आहेत. या बसेसद्वारे PMPML रोज सुमारे 12 लाख प्रवाशांना सेवा देत असून दररोज अंदाजे 1.5 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे. सध्या 381 मार्गांवर बस चालतात आणि दररोज 3.6 लाख किमीचे अंतर व्यापले जाते. या डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यास पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीची गुणवत्ता आणि क्षमता दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.