सॉन्ग यंग-क्यू यांचे निधन; कोरियन अभिनेता कारमध्ये मृतावस्थेत आढळला
प्रसिद्ध दक्षिण कोरियन अभिनेता सॉन्ग यंग-क्यू यांचे निधन; कारमध्ये मृतावस्थेत आढळला मृतदेह
प्रसिद्ध कोरियन अभिनेता सॉन्ग यंग-क्यू यांचा मृतदेह कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नाही; पोलिस तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : दक्षिण कोरियातील मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सॉन्ग यंग-क्यू (Song Young Kyu) यांचा मृतदेह कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या या अभिनेत्याच्या मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
स्रोतांनुसार, सॉन्ग यंग-क्यू हे एका पार्किंग परिसरात त्यांच्या गाडीमध्ये गंभीर अवस्थेत बेशुद्ध आढळून आले. तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेच्या काही दिवस आधीच सॉन्ग यंग-क्यू यांच्यावर दारू पिऊन वाहन चालवल्याचा (DUI) गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि त्यांना काही प्रोजेक्ट्समधून देखील वगळण्यात आले होते. या घडामोडींमुळे ते मानसिक तणावात होते, अशी शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.
अभिनेत्याच्या मृत्यूबाबत अधिकृत मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल (autopsy report) आल्यानंतर अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आत्महत्या, अपघात किंवा इतर कोणताही संशय असण्याच्या शक्यतेकडेही लक्ष केंद्रित केले आहे.
सॉन्ग यंग-क्यू यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर दक्षिण कोरिया तसेच आंतरराष्ट्रीय चाहत्यांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. सोशल मीडियावर “RIP Song Young Kyu” हे हॅशटॅग ट्रेंड होत असून, अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.