पुण्यात गुन्हे शाखेची कारवाई: विधीसंघर्षीत बालकाकडून ₹2.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

सराईत विधीसंघर्षीत बालकाकडून मोटारसायकल, रिक्षा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यात गुन्हे शाखा युनिट-४ ने मोठी कारवाई करत एका सराईत विधीसंघर्षीत बालकाकडून मोटारसायकल व रिक्षा जप्त केली. विश्रांतवाडीतील दोन गंभीर गुन्ह्यांची उकल; आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट-४ ने विशेष कारवाई करत एका सराईत विधीसंघर्षीत बालकाच्या ताब्यातून मोटारसायकल व रिक्षा असा सुमारे २.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विश्रांतवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील दोन गंभीर गुन्ह्यांची उकल झाली असून, या मुलास गुन्ह्यात वापरलेली साधने व चोरीचा ऐवजासह अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुणे शहरात विविध गंभीर गुन्ह्यांत गुंतलेल्या आरोपींची तपासणी सुरू असताना, ४ ऑगस्ट २०२५ रोजी एक माहिती मिळाली की जयवंत सोसायटी, विश्रांतवाडी येथे घरफोडी करणारा एक विधीसंघर्षीत बालक कॉमर्स झोन चौक, येरवडा येथे उभा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऐश्वर्य भरत कांबळे (वय १७ वर्षे ९ महिने) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह दोन गुन्ह्यांची कबुली दिली. यात विश्रांतवाडी येथील बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणे, तसेच दुसऱ्या प्रकरणात रात्रीच्या वेळी हडपसरमधून रिक्षा चोरून त्याचा वापर करत टिंगरेनगरमधील बंद घरात चोरी करणे यांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिसांनी एका चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह एक रिक्षा, एक लोखंडी कात्री, आणि चोरीस गेलेले घड्याळ व इतर साहित्य असा एकूण २.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेली वाहने चोरी केल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी पार्क केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपीस विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली युनिट-४ चे पथक – उपनिरीक्षक वैभव मगदुम, हवालदार अमजद शेख, सुभाष आव्हाड, वैभव रणपिसे, जहांगीर पठाण यांच्यासह करण्यात आली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter