Manoj Jarange Patil: 27 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत; ‘एक घर, एक गाडी’ मोहीमेचं आवाहन
Manoj Jarange Patil: 27 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत; 'एक घर, एक गाडी' मोहीमेचं आवाहन
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; 27 ऑगस्टला मुंबई मोर्चा, ‘एक घर, एक गाडी’ मोहीमेचं आवाहन, सरकारला अल्टिमेटम.
सायली मेमाणे
पुणे ७ ऑगस्ट २०२५ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 27 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईत धडकणार आहे. यासाठी त्यांनी संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला ‘एक घर, एक गाडी’ या संकल्पनेतून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोर्चा केवळ सामूहिक शक्तीप्रदर्शन न करता, मराठा समाजाच्या निर्धाराचं प्रतीक ठरणार आहे. जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “आरक्षणाचा विजय मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही.”
सोलापुरात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर थेट टीका केली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने नाटकबाजी थांबवावी. जरांगे यांचा रोख ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीवर आहे. त्यांनी मराठा बांधवांना आवाहन करताना सांगितले की, “पाण्याच्या टँकरसह या, आम्ही शांततेत येतो, पण अन्याय झाला तर गप्प बसणार नाही.”
त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला की, मोर्चाच्या वेळी जर कुणी मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीचार्ज केला किंवा असहकार्य केले, तर त्या कृत्याच्या जबाबदारी सरकारवरच राहील. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “कोणीही अशांतता निर्माण केल्यास तो व्यक्ती सरकारचा हस्तक समजण्यात येईल.” यासोबतच जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केले की, मोर्चादरम्यान कुठल्याही प्रकारचा हिंसाचार, जाळपोळ किंवा दगडफेक होऊ नये. जर कुणी असं करत असेल, तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या.
राज्यातील मराठा समाजाने मागील काही महिन्यांपासून आरक्षणासाठी अनेक आंदोलनं केली आहेत. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्वाची भूमिका पार पाडली असून, त्यांचा 27 ऑगस्टचा मोर्चा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची उपस्थिती राहणार असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही राज्य सरकारसमोरील आव्हान मोठं आहे.