PCPL क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; संभाजी किंग्ज आणि टायगर्स संघांची विजयी सलामी
सायली मेमाणे
पुणे १६ मे,२०२५: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित आणि माणिकचंद ऑक्सिरीच प्रायोजित ‘पिंपरी चिंचवड प्रीमिअर लीग’ (PCPL) टवेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेची सुरुवात जल्लोषात झाली. उद्घाटन समारंभ माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी छत्रपती संभाजी किंग्ज आणि विश्व टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली.

हिंजवाडी येथील फोर स्टार मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजी किंग्जने बंट्स वॉरियर्सचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना संघाने १४५ धावा केल्या. अथर्व भोसले, अजिंक्य खानदेशे आणि विशाल गव्हाणे यांनी दमदार फलंदाजी केली. बंट्स संघाच्या प्रशांत तेलंगेने ४ बळी घेतली. प्रत्युत्तरात बंट्स वॉरियर्सचा डाव १२७ धावांवर संपुष्टात आला. सईश शिंदेने ३, तर विशाल गव्हाणे आणि हरीश बाकळे यांनी प्रत्येकी २ बळी घेत विजय निश्चित केला. सामनावीराचा किताब विशाल गव्हाणे याने पटकावला.
दुसऱ्या सामन्यात विश्व टायगर्सने मोरे पाटील पॅकर्सवर ७ धावांनी निसटता विजय मिळवला. टायगर्सने १० षटकांत ७२ धावा केल्या. अर्णेश रॉयने ३४ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेले. प्रतिस्पर्धी मोरे पाटील पॅकर्स संघ ६५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अर्णेश रॉय सामनावीर ठरला.
उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे, संघमालक विजय कापसे, रवी शेट्टी, सुदाम मोरे पाटी, आरती तांबोळी, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, विजय कोतवाल, प्रदीप वाघ, मुकेश गुजराथी, नरेंद्र कदम, प्रशांत तेलंगे, युसुफ बर्हाणपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.