• Fri. Jul 25th, 2025

NewsDotz

मराठी

महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 16, 2025
पुण्यात फडणवीस यांची पत्रकार परिषद: महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय, विकास, शिक्षण आणि आरोग्यावर भर.पुण्यात फडणवीस यांची पत्रकार परिषद: महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय, विकास, शिक्षण आणि आरोग्यावर भर.

पुण्यात फडणवीस यांची पत्रकार परिषद: महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय, विकास, शिक्षण आणि आरोग्यावर भर.

सायली मेमाणे

पुणे १६ मे,२०२५: येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रितपणे म्हणजेच महायुती म्हणून लढायच्या, असा स्पष्ट निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात जाहीर केला. काही ठिकाणी अपवादात्मक स्थितीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले, तरी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित महापालिका आयुक्त व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी फडणवीस आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि महायुती हेच आमचे धोरण आहे. काही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील, तर त्या जागा वाटपात अडचणी येतात. मात्र त्या ठिकाणीही सकारात्मक प्रचार करणार असून, परस्पर टीका न करता एकसंघपणे पुढे जाऊ, असा आमचा दृष्टिकोन राहील. त्यांनी राज्यातील शहरांना ‘ग्रोथ इंजिन’ असे संबोधत नियोजनबद्ध विकासावर भर देण्याचे आवाहन केले.
शहरे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, तरच रोजगार, गुंतवणूक आणि करसंकलन वाढेल, असे ते म्हणाले. त्यांनी प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर यावरही भर दिला. विशेषत: रस्ते रुंदीकरणासाठी TDR चा वापर, बांधकाम परवानग्यांमध्ये विलंब टाळण्यासाठी ‘ऑटो-डीसीआर’ प्रणाली, आणि फाईल किती वेळ अधिकाऱ्यांकडे प्रलंबित होती याचा संपूर्ण डेटा एकाच कागदावर मिळावा यासाठी डिजिटल पद्धतींचा वापर आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्राथमिक शिक्षण व आरोग्यविषयक सेवा सुधारण्यासाठीही त्यांनी चिंता व्यक्त केली. महापालिकांच्या शाळा बंद पडत असल्याची बाब गंभीर असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही सध्याची गरज आहे. शिवाय ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ व केंद्र सरकारच्या ‘वेलनेस सेंटर’ यांचा प्रभावी अंमलबजावणी न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे महापालिकांच्या आरोग्यखर्चाचा भार वैद्यकीय महाविद्यालयांकडे वळला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, मिळणारा निधी वेळेवर वापरून विकासकामांना गती द्यावी. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साकारण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, निधीचा पारदर्शक वापर आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी हीच मुख्य त्रिसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज आदी मान्यवर उपस्थित होते.