आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय चिमुकलीवर वांशिक हल्ला; “डर्टी इंडियन” म्हणत मारहाण

0
आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय चिमुकलीवर वांशिक हल्ला; "डर्टी इंडियन" म्हणत मारहाण

आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय चिमुकलीवर वांशिक हल्ला; "डर्टी इंडियन" म्हणत मारहाण

आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात एका ६ वर्षीय भारतीय मुलीवर वांशिक द्वेषातून हल्ला झाला. “गो बॅक टू इंडिया” असे म्हणत तिला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

सायली मेमाणे

पुणे ८ ऑगस्ट २०२५ : आयर्लंडमध्ये वांशिक द्वेषाची एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका ६ वर्षांच्या भारतीय चिमुकलीवर स्थानिक मुलांनी निर्घृणपणे हल्ला केला आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात संध्याकाळी ७.३० वाजता घडली. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना, १२ ते १४ वर्षांच्या काही मुलांच्या गटाने तिच्यावर अचानक हल्ला चढवला.

मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ती आपला १० महिन्यांचा मुलगा घरात खाऊ घालण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिची मोठी मुलगी घराबाहेर खेळत होती. काही वेळातच ती रडत घरात आली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा दिसत होत्या. मुलांच्या गटाने तिच्या चेहऱ्यावर बुक्की मारल्या, तिला जमिनीवर ढकलले, केस ओढले आणि गंभीर म्हणजे तिच्या गुप्तांगावरही मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्या चिमुकलीच्या अंगावरून सायकलही चालवण्यात आली.

या हिंसक हल्ल्यासोबत वांशिक टिप्पणी देखील करण्यात आली. “डर्टी इंडियन, गो बॅक टू इंडिया” असे अपमानास्पद शब्द त्या चिमुकलीला ऐकावे लागले. तिच्या आईने सांगितले की मुलगी या प्रकारामुळे प्रचंड घाबरली असून तिला अजूनही हे स्पष्टपणे सांगता येत नाही की नेमकं काय घडलं.

ही चिमुकली आणि तिचे कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. नुकतेच त्यांना आयर्लंडचे नागरिकत्वही मिळाले आहे. तिची आई नर्स म्हणून कार्यरत असून वडील देखील स्थानिक पातळीवर नोकरी करतात. या घटनेनंतर आईने पोलिसांत तक्रार नोंदवली असून संबंधित मुलांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र तिने मुलांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचे समुपदेशन (काउन्सलिंग) करण्यात यावे, अशी विनंती केली आहे.

आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर वांशिक द्वेषाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी डब्लिनमध्ये एका ४० वर्षीय भारतीय पुरुषावरही हल्ला करण्यात आला होता. त्याला मारहाण करून कपडे फाडण्यात आले होते. विशेषतः टॅलाघ्ट आणि क्लोडांल्किन या भागांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ही घटना केवळ एका चिमुकलीवर झालेला हल्ला नाही, तर एका संपूर्ण समुदायाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करते. वांशिक द्वेषाला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. भारतीय दुतावास, तसेच आयर्लंड सरकारकडून यावर कठोर प्रतिक्रिया येणे आवश्यक आहे, अशी मागणी आता सोशल मीडियावरूनही केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed