विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी खासदारांना दिल्लीमध्ये नवं घर; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी खासदारांना दिल्लीमध्ये नवं घर; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी नवे निवासी संकुल उद्घाटन केले. तर दुसरीकडे, मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलेले असून एका बाजूला मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी खासदार रस्त्यावर उतरले आहेत तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी खासदारांसाठी नव्याने बांधलेल्या आलिशान निवासी संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ९ वाजता या बहुमजली इमारतीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, किरण रिजिजू यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या संकुलातील प्रत्येक फ्लॅट सुमारे ५,००० चौरस फूट कार्पेट एरियासह बांधले गेले असून त्याची रचना खासदारांच्या अधिकृत तसेच सार्वजनिक कामांसाठी सुलभतेने करता येईल अशा प्रकारे केली आहे. कॉम्प्लेक्समध्ये निवासस्थानांसोबत कार्यालये, कर्मचाऱ्यांची घरे, सामुदायिक केंद्र यांचा समावेश आहे. सर्व इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत आणि आधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हा परिसर अपंगांसाठी अनुकूल पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी यांनी सिंदूराचे रोप लावले आणि कामगारांची भेट घेऊन त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
भाजप खासदार मनोज तिवारी यांनी या संकुलाचे कौतुक करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गरिबांपासून खासदारांपर्यंत सर्वांना घर मिळत आहे. खासदार राजीव प्रताप रुडी यांनी ही भव्य इमारत प्रभावी कामासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी देखील या उपक्रमाचे अभिनंदन केले.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला मतचोरीच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या ३०० पेक्षा अधिक खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला. ‘सेव्ह व्होट’चे बॅनर्स हातात घेऊन खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले. मोर्चासाठी परवानगी नाकारल्याने खासदारांनी संसदेच्या आवारातच आंदोलन सुरू केले. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
या घडामोडींमुळे दिल्लीतील राजकारणात गहजब उडाले आहे. एका बाजूला सत्ताधारी खासदारांना आधुनिक सोयीसुविधांनी युक्त नवे घर मिळत असताना दुसऱ्या बाजूला विरोधी खासदार रस्त्यावर उतरून मतचोरीविरोधात लढा देत आहेत. या घटनांमुळे ‘विरोधक रस्त्यावर तर सत्ताधारी घरात’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.