सलग सुट्ट्यांचा परिणाम: वेरूळ लेणी आणि भिमाशंकर भाविकांनी फुल्ल, वाहतूक कोंडीमुळे पर्यटक त्रस्त
सलग सुट्ट्यांचा परिणाम: वेरूळ लेणी आणि भिमाशंकर भाविकांनी फुल्ल, वाहतूक कोंडीमुळे पर्यटक त्रस्त
स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ आणि भिमाशंकर येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, पार्किंगची अडचण आणि वाहतूक कोंडीमुळे भाविकांना मोठा त्रास.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑगस्ट २०२५ : सलग सुट्ट्यांचा लाभ घेत पर्यटक आणि भाविकांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांकडे मोठ्या संख्येने धाव घेतली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारची शासकीय सुट्टी, शनिवारी गोपाळकाला व गोकुळाष्टमी, आणि रविवारी आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे हा संपूर्ण विकेंड अनेकांसाठी प्रवासासाठी उत्तम ठरला. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री. घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे लाखो पर्यटकांनी गर्दी केली आहे. यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांब पसरलेल्या दिसून येत आहेत.
योग्य पार्किंग व्यवस्था न मिळाल्यामुळे अनेक पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाटेल तिथे वाहने लावली आहेत. त्यामुळे लेणी बघण्यास आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्दीचा फायदा स्थानिक व्यापारास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लॉजिंग, हॉटेल्स, स्थानिक विक्रेते, प्रसाद आणि पूजेच्या वस्तू विकणारे दुकानदार यांना या पर्यटकांमुळे भरपूर व्यवसाय मिळाला असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
दुसरीकडे, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भिमाशंकर येथेही सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. येथे भाविकांची दर्शनासाठी १० किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागलेली असून, रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात पोहोचण्यापूर्वी भाविकांना पाच ते सहा किलोमीटर आधीच वाहनं पार्क करून पुढचा प्रवास पायी करावा लागत आहे. रस्त्यावरील या कोंडीत अनेक भाविक तासंतास अडकून राहिले आहेत. या असुविधांमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली असल्याचे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभरून आणि देशभरातून आलेल्या पर्यटकांमुळे वेरूळ आणि भिमाशंकर ही दोन ठिकाणं फुल्ल झाल्याचे चित्र दिसून आले आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे एकीकडे स्थानिकांना फायदा झाला असला, तरी पार्किंग व वाहतूक व्यवस्थेच्या कमतरतेमुळे अनेक भाविक व पर्यटक त्रस्त झाले आहेत.