मतदारसंघात 13 हजार दुप्पट नावे; बच्चू कडूंचा निवडणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप
मतदारसंघात 13 हजार दुप्पट नावे; बच्चू कडूंचा निवडणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप
आमदार बच्चू कडू यांनी मतदारसंघात 13 हजार डुप्लिकेट नावे असल्याचा आरोप करत भाजपवर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार असल्याचं जाहीर.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑगस्ट २०२५ :प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा थेट आणि आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या मतदारसंघात १३ हजार डुप्लिकेट नावे आढळल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, “निवडणुका लढवाव्यात ती नाही हा विचार माझ्या मनात आहे. मला वाटतं मतदान केंद्रांची गरजच उरलेली नाही. थेट भाजपच्या कार्यालयात मतपेट्या ठेवाव्यात आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मतदान करून नगरसेवक निवडून आणावा. म्हणजे निवडणुकीचा खर्च तरी वाचेल.” अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघात तब्बल १३ हजार मतदारांची नावे दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना धोका देणारे असून, त्यांनी यासंदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार देणार असल्याचेही सांगितले.
बच्चू कडू यांचा आरोप म्हणजे केवळ एका मतदारसंघापुरताच मर्यादित नसून, संपूर्ण राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करणारा आहे. मतदान यादीतील अपप्रकार, बनावट नोंदी आणि पक्षीय राजकारण यामुळे लोकशाही संस्था बदनाम होत असल्याचे ते म्हणाले.
या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. निवडणूक आयोग यावर काय पावले उचलतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.