मुंबईत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे अपहरण बेटिंग ॲपविरोधातील रील्समुळे मारहाण, चार आरोपी अटकेत

0
मुंबईत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे अपहरण बेटिंग ॲपविरोधातील रील्समुळे मारहाण, चार आरोपी अटकेत

मुंबईत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे अपहरण बेटिंग ॲपविरोधातील रील्समुळे मारहाण, चार आरोपी अटकेत

बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सविरोधात रील्स करणाऱ्या कंटेंट क्रिएटरचे मुंबईत अपहरण करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

पुणे ०८ ऑगस्ट २०२६ : मुंबईत सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरच्या अपहरण आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सविरोधात जनजागृती करणाऱ्या २८ वर्षीय कंटेंट क्रिएटरला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणाच्या रील्सचा राग मनात धरून त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पवई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केली आहे.

चेतन चंद्रकांत देओलकर असे पीडित कंटेंट क्रिएटरचे नाव आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर जनजागृती करणाऱ्या रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या काही इन्फ्लुएन्सर्सवर टीका करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने आरोपींपैकी प्रतीक राम शिंदे याच्या बेटिंग ॲपच्या प्रचार करणाऱ्या रील्सवर रोस्ट व्हिडीओ तयार केले होते. या व्हिडीओमुळे आरोपी नाराज झाले आणि त्यातूनच चेतनला धडा शिकवण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

२६ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास चेतन पवईतील पंचकुटीर परिसरात असताना यश रणधीर बाबरे याने त्याला गाठले. त्यानंतर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ नेऊन त्याला जबरदस्तीने वाहनात बसवण्यात आले. गाडीत आधीच प्रतीक शिंदे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर उर्फ एस.के. हे तिघे उपस्थित होते. आरोपींनी चेतनला सुऱ्याचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी चेतनच्या मानेवर पाय ठेवून त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर मारहाण करताना त्याचा मोबाईलवर व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला. बेटिंग ॲप्सविरोधात यापुढे रील्स तयार करू नयेत, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीनंतर आरोपींनी चेतनला रात्री साडेअकराच्या सुमारास नवी मुंबईतील कळंबोली परिसरात रस्त्यावर सोडून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर उपचार घेतल्यानंतर चेतनने २ ऑगस्ट रोजी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी आधी यश बाबरे याला विक्रोळी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींची माहिती समोर आली. त्यानंतर मुख्य आरोपी प्रतीक शिंदे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर यांना पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सापळा रचून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पवई पोलीस करत आहेत.

सोशल मीडियावर एखाद्या विषयावर भूमिका मांडणाऱ्या किंवा जनजागृती करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडिया वादातून प्रत्यक्ष हिंसाचारापर्यंत प्रकरण पोहोचल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संभाव्य बाबींचाही तपास केला जात आहे.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed