गुटख्याच्या व्यसनामुळे शोकांतिका : पत्नीनं मुलांसह घेतलं विष, तिघांचा मृत्यू
गुटख्याच्या व्यसनामुळे शोकांतिका : पत्नीनं मुलांसह घेतलं विष, तिघांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील इटमा डुडैला गावात गुटख्याच्या पैशांवरून पती-पत्नीचा वाद इतका भीषण ठरला की पत्नीने तीन मुलांना विष पाजून स्वतःही प्राशन केले. यात तिघांचा मृत्यू झाला असून एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑगस्ट २०२५ : उत्तर प्रदेशातील इटमा डुडैला गावात घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर व्यसनाधीनतेमुळे समाज किती पोखरला गेला आहे याचे स्पष्ट उदाहरण आहे. पती-पत्नीतील एका किरकोळ वादामुळे तीन निष्पाप जीवांचे बलिदान झाले आणि एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. गुटख्यासारख्या व्यसनापायी आईने आपल्या मुलांना विष पाजून स्वतःचेही आयुष्य संपवले, ही बाब समाजाला हादरवणारी आहे.
हा प्रकार मारकुंडी क्षेत्रातील इटमा डुडैला गावातील बब्बू यादव या चालकाच्या कुटुंबात घडला. त्याची पत्नी ज्योती यादव, वय 26, हिला गुटख्याचे प्रचंड व्यसन होते. गुटखा न मिळाल्यास तिला चैन पडत नव्हते. त्यामुळे ती सतत पतीकडे पैसे मागत असे. शनिवारी सकाळी गुटख्यासाठी पैसे न दिल्यामुळे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. बब्बू यादवने पत्नीला व्यसन सोडण्याचा सल्ला दिला आणि मुलांच्या हिताचा विचार करून तिला गुटखा खाऊ नको असे समजावले. मात्र ज्योतीने हे न मानता उलट संतापून घेतला आणि थरकाप उडवणारे पाऊल उचलले.
बब्बू घरी परतल्यावर त्याला आपल्या घरात भीषण दृश्य पाहायला मिळाले. त्याचा मुलगा पोट धरून जमिनीवर तडफडत होता, तर चार वर्षांची चिमुरडी आईने काहीतरी कडू खायला दिल्याचे सांगत रडत होती. एक वर्षांची बुलबुल आधीच मृत पडली होती आणि पत्नी ज्योती देखील वेदनेत तडफडत होती. घाबरलेल्या बब्बूने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी एक वर्षांच्या मुलीला मृत घोषित केले. पुढे ज्योती आणि चार वर्षांचा मुलगा चंद्रमा यांनीही उपचारादरम्यान प्राण गमावले. सध्या पाच वर्षांचा दीपचंद मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणाने पोलिसही हादरले असून त्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे. बब्बू यादवने पोलिसांना सांगितले की पत्नी इतकी व्यसनी झाली होती की गुटख्याशिवाय ती राहू शकत नव्हती. अगदी टॉयलेटला जातानाही गुटखा लागतो, अशी तिची अवस्था होती. त्याने तिला अनेकदा समजावले, मुलांच्या भविष्यासाठी व्यसन सोडण्याचा आग्रह केला, परंतु तिने त्याचे काहीही ऐकले नाही. उलट धमकी दिली की पैसे दिले नाहीत तर परिणाम भोगावे लागतील. अखेरीस तिच्या या हट्टामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.
ही घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवी शेवटाची कहाणी नाही, तर समाजासाठीही गंभीर धडा आहे. व्यसनाधीनता किती भीषण परिणाम घडवू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. गुटख्यासारखे साधे वाटणारे व्यसनही कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करू शकते. यामुळेच व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित होते. विशेषतः ग्रामीण भागात गुटखा, तंबाखू, दारू यांसारख्या व्यसनांनी कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
समाजाने अशा घटनांकडे फक्त हळहळ व्यक्त करण्याऐवजी धडा घेण्याची गरज आहे. व्यसनांविरोधात जागरूकता वाढवणे, कुटुंबांना वेळोवेळी समजावणे आणि व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. ज्योती यादव आणि तिच्या मुलांच्या मृत्यूने पुन्हा एकदा व्यसनमुक्त भारताची गरज अधोरेखित केली आहे.