Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे वाहतुकीत बदल; बीड-पुणे महामार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

0
Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे वाहतुकीत बदल; बीड-पुणे महामार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे वाहतुकीत बदल; बीड-पुणे महामार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनामुळे बीड-पुणे महामार्ग बंद करण्यात आला आहे. वाहतुकीत बदल जाणून घ्या. पर्यायी रस्त्यांची संपूर्ण माहिती वाचा.

सायली मेमाणे

पुणे २६ ऑगस्ट २०२५ : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. उद्यापासून राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होत असताना, दुसरीकडे लाखो मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यामुळे महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आधीच वाहतुकीत बदल लागू केले आहेत.

२९ ऑगस्टपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होणार आहे. यासाठी राज्यभरातून चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या ताफ्यातून आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून या मोर्च्याला सुरुवात होईल. २७ ऑगस्ट रोजी मोर्चा शहागड, तुळजापूर, पैठण, शेवगाव या मार्गे निघून २९ ऑगस्टपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीडसह विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी होणार आहेत.

मोर्च्यामुळे वाहतुकीवर होणारा ताण कमी करण्यासाठी २६ ते २७ ऑगस्ट दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीड-पुणे महामार्गावर वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत. बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर संपूर्ण वाहतूक बंद राहणार आहे.

वाहतुकीत करण्यात आलेले बदल खालीलप्रमाणे आहेत:

१) छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठण मार्गे शेवगावकडे जाणारी वाहने आता छत्रपती संभाजीनगर, वाळूज, गंगापूर, नेवासा मार्गे शेवगावकडे जातील आणि येतील.

२) शहागड, हिरडपुरी, तुळजापूर, नवगाव मार्गे पैठणकडे जाणारी वाहने आता शहागड, डोणगाव, पाचोड मार्गे पैठणकडे जातील.

३) पैठण, नवगाव, हिरडपुरी मार्गे शहागडकडे जाणारी वाहने आता पैठण, पाचोड, डोनगाव मार्गे शहागडकडे जातील.

मोर्च्यादरम्यान लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. वाहतूक वळविण्यासोबतच सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस फौज तैनात केली जाणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा वाहनधारकांना वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणासोबतच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेलाही मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाहतूक बदलाची ही सूचना नागरिकांनी गांभीर्याने घेतल्यास संभाव्य कोंडी टाळता येईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed