विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली | तीन ठार, अनेक अडकले
विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली | तीन ठार, अनेक अडकले
विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंटची एक बाजू कोसळली. दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, अनेक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता. बचावकार्य सुरू.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : विरार (पालघर): राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच विरारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. विरार पूर्वेच्या नारंगी भागातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत मंगळवारी अचानक कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, ही इमारत जुन्या व जीर्ण अवस्थेत होती. इमारतीची एक संपूर्ण बाजू कोसळल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात धावपळ उडाली. घटनेनंतर नागरिकांनी तातडीने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. दरम्यान, ढिगाऱ्याखालून काहींना बाहेर काढण्यात यश आले आहे, मात्र अजूनही काही जण अडकले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
घटनेची माहिती मिळताच विरार अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या दुर्घटनेबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातातील मृतांना शोकसंवेदना व्यक्त करत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीने मदत जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विरारमधील ही दुर्घटना पुन्हा एकदा जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा करत आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या अपघातामुळे आनंदावर विरजण पडले असून, स्थानिक नागरिक प्रशासनाकडून जबाबदारीची मागणी करत आहेत.