सुबोध भावे यांच्या गणपती देखाव्यातून दिला अनोखा संदेश – “आई वडिलांना सांभाळा”
सुबोध भावे यांच्या गणपती देखाव्यातून दिला अनोखा संदेश – “आई वडिलांना सांभाळा”
अभिनेता सुबोध भावे यांनी घरी गणपती आणि कार्तिकाचा देखावा साकारून समाजाला खास संदेश दिला आहे. त्यांच्या देखाव्यातून “आई-वडिलांना सांभाळा” हा मोलाचा संदेश देण्यात आला आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलाकार आपल्या घरी अनोख्या पद्धतीने बाप्पाची प्रतिष्ठा करतात. यात प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांचा देखील सहभाग विशेष ठरतो. यंदा सुबोध भावे यांनी आपल्या घरच्या गणपतीसाठी एक अनोखा देखावा साकारला आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींची प्रतिमा आहे. या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
सुबोध भावे यांच्या या देखाव्यातून “आई-वडिलांना सांभाळा” हा संदेश देण्यात आला आहे. आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकदा पालकांकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत गणपतीच्या उत्सवातून सुबोध भावे यांनी पालकांची सेवा आणि त्यांचा सन्मान यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि मूल्ये जपण्याचा सण आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कलाकार देखील पुढे येत असल्याचे उदाहरण या देखाव्यातून दिसून येते. सुबोध भावे यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
गणेशोत्सव साजरा करताना भक्तांनी केवळ आरास, सजावट किंवा उत्सवाचा गाजावाजा न करता त्यामागील आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचा संदेश या देखाव्यातून प्रभावीपणे अधोरेखित झाला आहे.