वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, जम्मूच्या दोडा जिल्ह्यात ढगफुटी; 30 जणांचा बळी
वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, जम्मूच्या दोडा जिल्ह्यात ढगफुटी; 30 जणांचा बळी
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन झाले, तर दोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे 30 जणांचा मृत्यू. नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहर वाढला असून वैष्णोदेवी यात्रेला अडथळा निर्माण झाला आहे. जम्मूच्या कटरा येथून सुरू होणाऱ्या श्री माता वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर अर्धकुंवारी भागात मोठे भूस्खलन झाले. या घटनेमुळे यात्रेकरूंची हालचाल काही काळासाठी थांबवावी लागली. पावसामुळे सतत घसरणीचा धोका असल्याने प्रशासनाने सुरक्षा दल तैनात करून यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
दुसरीकडे, जम्मूच्या दोडा जिल्ह्यात ढगफुटीची घटना घडली. अचानक मुसळधार पावसामुळे गावात पाण्याचा पूर आला आणि घरं व झोपड्यांना फटका बसला. अधिकृत आकडेवारीनुसार या ढगफुटीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासन, SDRF व NDRF पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.
या मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमधील नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. डोंगराळ भागात पावसामुळे रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक ठिकाणी पूल कोसळल्याने गावांशी संपर्क तुटला आहे.
तज्ज्ञांच्या मते, ढगफुटी व भूस्खलनाच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण हवामानातील अनियमित बदल, वृक्षतोड व डोंगराळ भागातील मानवी हस्तक्षेप असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, वैष्णोदेवी यात्रेकरूंना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून यात्रेचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच यात्रेला परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.