Thane News : घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर शरद पवार गटाचे आंदोलन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखी कृती
घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर शरद पवार गटाचे आंदोलन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखी कृती
ठाणेतील घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : ठाणे : ठाण्यातील प्रमुख घोडबंदर रोडवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार आणि नागरिकांच्या सहकार्याने या रस्त्यावर अनोख्या पद्धतीने आंदोलन पार पडले.
ओवाळा-माजिवडा विधानसभा 146 युवक अध्यक्ष श्रीकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे शहर युवा काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केवळ खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यात आले नाही, तर कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याचे कामही केले.
घोडबंदर रोड हा ठाण्याचा महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो वाहनांची वाहतूक येथे होते. मात्र गेल्या काही महिन्यांत या रस्त्याची अवस्था अधिकच खालावली आहे. मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. नागरिकांना दैनंदिन प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा पदाधिकारी गजानन चौधरी, राजेश साटम, एकनाथ जाधव यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजी, फलक लावणे आणि प्रत्यक्ष खड्डे बुजवणे या माध्यमातून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला चढवला.
श्रीकांत भोईर यांनी सांगितले की, “जनतेचे आयुष्य धोक्यात घालून प्रशासन डोळेझाक करत आहे. खड्डे बुजवणे ही आमची जबाबदारी नसली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हे काम करत आहोत.”
स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाचे स्वागत करत सरकारने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली. या अनोख्या आंदोलनामुळे ठाण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.