Prithvi Shaw News: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालचे फोटो व्हायरल, चाहत्यांची कमबॅकची अपेक्षा
Prithvi Shaw News: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालचे फोटो व्हायरल, चाहत्यांची कमबॅकची अपेक्षा
पृथ्वी शॉने गणेश चतुर्थीच्या दिवशी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवालसोबतचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी कमबॅकसाठी शुभेच्छा देत त्याच्या नव्या करिअर प्रवासावर चर्चा सुरू केली आहे.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण देशभरात सुरू असताना भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला शॉ याने गणेश चतुर्थीच्या दिवशी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवालसोबत गणपतीचे दर्शन घेतले. शॉने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो आणि आकृती अग्रवाल एकत्र दिसत असून, सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी “So pretty,” किंवा “Sending our love” अशा कौतुकाच्या कमेंट्स दिल्या तर अनेकांनी शॉच्या क्रिकेट करिअरबद्दल चिंता व्यक्त केली. “Bhai it’s time to comeback,” आणि “I am waiting for your comeback” अशा कमेंट्समधून चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली.
काही वर्षांपूर्वी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करून पृथ्वी शॉला भारताचा भावी स्टार म्हणून पाहिले जात होते. कसोटी पदार्पणात शतक ठोकून त्याने मोठी छाप सोडली होती. मात्र, नंतर फिटनेस समस्या, खराब फॉर्म आणि सातत्याचा अभाव यामुळे त्याला भारतीय संघातून बाहेर जावे लागले. त्याच्या फॉर्मातील घसरण एवढी गंभीर होती की, गेल्या वर्षीच्या आयपीएल लिलावात पहिल्यांदाच कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही.
करिअरला नवी दिशा देण्यासाठी शॉने यंदा मुंबईऐवजी महाराष्ट्राकडून खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असे म्हणावे लागेल कारण पदार्पणाच्या सामन्यातच त्याने दमदार कामगिरी केली. 19 ऑगस्ट रोजी चेन्नई येथे झालेल्या बुची बाबू इनव्हिटेशनल स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध त्याने शानदार शतक ठोकले. 122 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने त्याने 111 धावा केल्या. शतक पूर्ण झाल्यावर शांतपणे बॅट उंचावत आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करताना तो दिसला.
गेल्या काही वर्षांपासून पृथ्वी शॉचा फॉर्म चांगला नसल्यामुळे त्याला मुंबई रणजी संघातून वगळण्यात आले होते. विजय हजारे ट्रॉफीसाठीही त्याची निवड झाली नव्हती. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत त्याने फक्त 197 धावा केल्या होत्या. त्याने भारतासाठी शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची आतुरता आहे.
आता महाराष्ट्राकडून खेळत असताना त्याने दाखवलेल्या दमदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाच्या दारात ठोठावण्याची संधी शॉसमोर आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले आकृती अग्रवालसोबतचे फोटो हे त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा घडवत असले तरी चाहत्यांचे लक्ष त्याच्या क्रिकेटिंग कमबॅककडेच जास्त आहे.
पृथ्वी शॉचे करिअर पुन्हा एकदा उंच भरारी घेईल का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.