रोहित पवारांनी शेअर केली डॅनी पंडितची व्हिडिओ
रोहित पवारांनी शेअर केली डॅनी पंडितची व्हिडिओ
रोहित पवारांनी डॅनी पंडितच्या हिंदू-मुस्लिम ऐक्य दर्शवणाऱ्या व्हिडिओचे कौतुक केले. धार्मिक सलोखा आणि बंधुभाव जपण्यासाठी केलेल्या या रीलला जातीयवाद्यांना दिलेला ठोस संदेश मानले जात आहे.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावरील एका व्हिडिओवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. रिलस्टार अथर्व सुदामे यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवणारी रील शेअर केली होती. मात्र काही कारणास्तव त्यांनी ती रील नंतर डिलीट केली. यानंतर डॅनी पंडितने याच विषयावर आणखी एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या रीलमध्ये धार्मिक ऐक्य, बंधुभाव आणि सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.
यावर राजकीय नेते आणि बारामतीचे आमदार रोहित पवार यांनी आपली ठोस भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत डॅनी पंडितचे मनापासून कौतुक केले आहे. पवार म्हणाले की, “धार्मिक सलोखा आणि बंधुभावाची होळी करुन त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी शेकणाऱ्यांना अजून एक दणका..! जातीयवाद्यांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र धर्माला आणि भागवत संप्रदायाला साजेसा व्हिडीओ केल्याबद्दल शाब्बास आणि Thank U डॅनी…! असं धाडस दाखवणं आज महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.”
रोहित पवारांच्या या विधानावरून स्पष्ट होते की, समाजात मतभेद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट उत्तर देण्यासाठी युवकांनी सोशल मीडिया एक शस्त्र म्हणून वापरले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक पिढ्यांपासून हिंदू-मुस्लीम सलोखा टिकवून ठेवला आहे. संत परंपरा, भागवत संप्रदाय आणि महाराष्ट्र धर्म यांची हीच खरी शिकवण आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली भेदभाव पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समाजाने एकत्रितपणे उत्तर देणे गरजेचे आहे.
डॅनी पंडितच्या या व्हिडिओला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर तो जलदगतीने व्हायरल झाला आहे. विविध नेते, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी या रीलचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे रोहित पवारांसारख्या नेत्याने या व्हिडिओला खुलेपणाने पाठिंबा दिल्याने या संदेशाला अधिक बळ मिळाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत धर्माच्या नावाखाली निर्माण होणारे वाद, राजकारणासाठी पेटवले जाणारे मुद्दे, आणि समाजात विभागणी करण्याच्या कटांना तोंड देण्यासाठी एकतेचे अशा प्रकारचे संदेश खूप महत्त्वाचे ठरतात. सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर समाजात सकारात्मकता पसरवणारे आणि एकात्मतेचे विचार मजबूत करणारे व्यासपीठ बनले आहे.
या पार्श्वभूमीवर डॅनी पंडितसारखे तरुण कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्स समाजाच्या सलोख्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा हा महाराष्ट्राच्या एकात्मतेचे द्योतक आहे. रोहित पवारांचा डॅनीला दिलेला पाठींबा हा केवळ एका रीलपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यापक संदेशाचा भाग आहे.
आजच्या काळात एकतेचे आणि धार्मिक सलोख्याचे असे संदेश सतत पोहोचवले गेले पाहिजेत. कारण, समाजात द्वेष आणि तणाव निर्माण करण्यापेक्षा प्रेम, बंधुभाव आणि परस्पर आदराने जगणे हेच खरी महाराष्ट्र संस्कृतीची ओळख आहे.