प्रथमच पंचतत्त्वांवर आधारित पालिकेची पर्यावरणपूरक गणेश सजावट, स्वच्छतेचा संदेश देणारी अनोखी कल्पना

0
प्रथमच पंचतत्त्वांवर आधारित पालिकेची पर्यावरणपूरक गणेश सजावट, स्वच्छतेचा संदेश देणारी अनोखी कल्पना

प्रथमच पंचतत्त्वांवर आधारित पालिकेची पर्यावरणपूरक गणेश सजावट, स्वच्छतेचा संदेश देणारी अनोखी कल्पना

पालिकेच्या नव्या इमारतीत प्रथमच गणेशाची प्रतिष्ठापना. “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित नैसर्गिक व इकोफ्रेंडली सजावट साकारली. पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पाच तत्वांचा अद्भुत संगम.

सायली मेमाणे

पुणे ३० ऑगस्ट २०२५ : सन २०११ साली नव्याने बांधलेल्या पालिकेच्या इमारतीत यंदा प्रथमच गणेशोत्सवाची धूम दिसून आली आहे. यंदाच्या उत्सवाला विशेषत्व प्राप्त झाले आहे ते अनोख्या सजावटीमुळे. पालिकेने गणेशोत्सवासाठी शाडुमातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केली असून, ही मूर्ती संपूर्णपणे इकोफ्रेंडली असल्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरते. गणरायाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने करण्यात आली असून, या उत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड दिल्याने त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.

“माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पालिकेने पंचतत्त्वांवर आधारित आकर्षक सजावट साकारली आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पाच नैसर्गिक घटकांचा सुंदर संगम या सजावटीत दिसून येतो. नैसर्गिक साधनांचा वापर करून उभारण्यात आलेला हा देखावा उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण रूप देतो. संपूर्ण सजावटीमध्ये वापरण्यात आलेली सर्व वस्तू या नैसर्गिक असल्यामुळे स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन आणि शाश्वततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचतो.

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली या सजावटीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे. पर्यावरणपूरकतेसोबतच लोकांना जागरूक करण्यासाठी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि ऐक्याचा उत्सव मानला जातो, मात्र त्याचवेळी या उत्सवामुळे पर्यावरणावर ताण येतो, हेही तितकेच खरे आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, प्लॅस्टिकची सजावट, आणि रासायनिक रंगांमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. या पार्श्वभूमीवर पालिकेने घेतलेला उपक्रम इतरांसाठी अनुकरणीय ठरू शकतो.

पंचतत्त्वांवर आधारित सजावट केवळ आकर्षकच नाही तर लोकांना निसर्गाशी असलेले आपले नाते समजावून देणारी आहे. पृथ्वी घटकाच्या प्रतिकात्मक सजावटीत माती, वृक्षारोपणाचा संदेश दिला गेला आहे, तर जल घटकासाठी स्वच्छतेचे व पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रतीक वापरले आहे. अग्नी घटकाच्या सजावटीत दिव्यांच्या प्रकाशातून ऊर्जा संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे, तर वायु घटकाच्या प्रतिकासाठी हरित झाडे व नैसर्गिक वाऱ्याचे प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे. आकाश घटकाने सजावटीला गूढता आणि पूर्णता दिली आहे.

संपूर्ण सजावटीकडे पाहताना केवळ डोळ्यांना आनंद मिळत नाही, तर एक गंभीर संदेशही मिळतो – पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून पालिकेने आदर्श घालून दिला आहे. श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संतुलित संगम घडवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यातील पिढीला स्वच्छ, हरित आणि सुरक्षित वातावरण मिळेल.

पालिका इमारतीतील हा उत्सव सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. पाहणाऱ्यांना सजावट आवडतेच, पण त्यामागील विचार अधिक भावतो. पंचतत्त्वांवर आधारित हा उपक्रम इतर मंडळांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपूरकतेचा संदेश समाजात अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचू शकतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed