स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा दुसरा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. गंभीर गुन्ह्याच्या कारणावरून न्यायालयाने जामीन नाकारत पुढील सुनावणीचे आदेश दिले.
सायली मेमाणे
पुणे १ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे याचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून, आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे स्पष्ट करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. त्याचबरोबर गाडेच्या विरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुढील सुनावणीला त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही पुणे पोलिसांना दिले आहेत.
ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली होती. स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये दत्तात्रेय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने एका तरुणीवर दोन वेळा बलात्कार केला होता. या घटनेनंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात गाडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर तब्बल ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
यापूर्वी गाडेने आपल्या वकिलांमार्फत पहिला जामीन अर्ज ३० जून रोजी दाखल केला होता, परंतु तो अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या आत त्याने पुन्हा दुसरा जामीन अर्ज सादर केला. बचाव पक्षाचे वकील वाजेद खान बीडकर यांनी या प्रकरणात आरोपी निर्दोष असल्याचा दावा करत, हा बलात्कार नसून परस्पर सहमतीने शारीरिक संबंध असल्याचे न्यायालयात मांडले. आरोपीची पत्नी आणि दोन मुले त्याच्यावर अवलंबून आहेत तसेच तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आता परिस्थितीत बदल झाला आहे, या कारणांवरून आरोपीला जामीन द्यावा अशी विनंती बचाव पक्षाने केली.
मात्र, सरकार पक्षाचे विशेष वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील श्रीया आवले यांनी या युक्तिवादास तीव्र विरोध दर्शविला. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ठाम युक्तिवाद सरकार पक्षाने केला. न्यायालयाने या बाजूला मान्यता देत आरोपीचा दुसरा जामीन अर्जही फेटाळला.
या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. तसेच, गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींना जामीन नाकारण्याची न्यायालयाची भूमिका समाजासाठी एक सकारात्मक संदेश ठरली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरण आता पुढील सुनावणीसाठी निश्चित झाले असून, न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडण्याची अपेक्षा आहे.