“धारावीकर नवरा नको ग बाई!” – लग्नासाठी धारावीला तरुणींचा नकार
“धारावीकर नवरा नको ग बाई!” – लग्नासाठी धारावीला तरुणींचा नकार
धारावीतील तरुणांना लग्नासाठी जोडीदार शोधण्यात अडचणी येत आहेत. सामाजिक कलंक, अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव यामुळे गावाकडील व शहरातील तरुणी धारावीकर मुलांशी लग्नास नकार देत आहेत.
सायली मेमाणे
पुणे ३ सप्टेंबर २०२५ : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यातून नव्या आयुष्याची सुरुवात होत असते. परंतु मुंबईतील धारावीत राहणाऱ्या तरुणांसाठी हा टप्पा अतिशय कठीण होत चालला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत लग्नासाठी योग्य वधू मिळवणे हे अनेक तरुणांसाठी मोठं आव्हान बनलं आहे.
वधू-वर सूचक मंडळांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतले सुशिक्षित, नोकरी करणारे आणि चांगल्या स्वभावाचे मुलगे असूनही त्यांना मुलींचा नकार मिळत आहे. कारण धारावीची प्रतिमा बाहेरच्या समाजात अत्यंत नकारात्मक पद्धतीने मांडली जाते. अनेक चित्रपट, बातम्या आणि सोशल मीडियावर धारावीला गुन्हेगारी, अस्वच्छता आणि दारिद्र्याचं प्रतीक दाखवलं गेल्याने धारावीतील मुलांशी लग्न करण्याबाबत मुलींचा विश्वास बसत नाही.
स्थानिक मॅरेज ब्युरोच्या म्हणण्यानुसार, आजच्या तरुणींना शिक्षण, करिअर आणि प्रतिष्ठित आयुष्याची अपेक्षा असते. त्या आपल्या भावी नवऱ्याकडून सुरक्षित घर, स्वच्छ वातावरण आणि सामाजिक प्रतिष्ठा यांची अपेक्षा करतात. मात्र धारावीत दाटीवाटीची वस्ती, मूलभूत सुविधांचा अभाव आणि अस्वच्छ सार्वजनिक शौचालये ही मोठी अडचण आहे. त्यामुळे गावाकडील तसेच शहरातील मुली धारावीत संसार थाटायला तयार नसतात.
धारावीतील तरुणांना त्यामुळे सतत वधूच्या शोधात अपयश येते आहे. एका स्थानिक महिलेने सांगितले की, तिच्या भावाला चांगली नोकरी असूनही लग्नासाठी सातत्याने नकार मिळतो. कारण मुलींच्या अपेक्षा केवळ पैशांवर मर्यादित नसून चांगल्या वातावरणावरही केंद्रित झाल्या आहेत. मुलींच्या मते, झोपडपट्टीत संसार करणे त्यांच्या भविष्यासाठी योग्य ठरणार नाही.
मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या डी. सेल्विन नाडर यांच्या मते, “धारावीतील सर्व तरुण वाईट नाहीत. मात्र धारावीची बाहेर उभी केलेली नकारात्मक प्रतिमा सहजासहजी बदलणार नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांचे लग्नाचे स्वप्न वारंवार लांबणीवर पडते.” त्यांनी पुढे सांगितले की, आधीच्या पिढ्या इतका विचार करत नसल्या तरी आता तरुणींच्या अपेक्षा अधिक वास्तववादी आणि कठोर झाल्या आहेत.
बालाजी मॅट्रिमोनीचे पनीर सेल्वम नाडर यांच्या मते, कोणतेही आईवडील आपल्या मुलीचं लग्न अस्वच्छ वस्तीमध्ये करायला तयार नसतात. त्यामुळे धारावीकर मुलांसाठी विवाहबंधनात अडथळे वाढत आहेत. काही मॅरेज ब्युरोवाल्यांनीही या समस्येमुळे आपला व्यवसाय बदलला असल्याची माहिती दिली आहे.
तथापि, धारावी पुनर्विकासाच्या आशेवर अनेक तरुण आहेत. पुनर्विकासानंतर घरांची स्थिती सुधारली, सुविधा उपलब्ध झाल्या आणि परिसरातील प्रतिमा बदलली, तर इथल्या तरुणांना देखील सुसंस्कृत वधू मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
धारावीतील तरुणांचे आजचे संघर्ष वास्तव मांडणारे असले तरी उद्या परिस्थिती बदलण्याची शक्यता नक्कीच आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली, तर “धारावीकर नवरा नको ग बाई” ही म्हणही केवळ इतिहासजमा होऊ शकते.