GST Council Meeting 2025: किराणा, कार आणि दुचाकी होणार स्वस्त; इलेक्ट्रिक वाहनांवर वाढणार कर
GST Council Meeting 2025: किराणा, कार आणि दुचाकी होणार स्वस्त; इलेक्ट्रिक वाहनांवर वाढणार कर
GST परिषद आजपासून सुरू, १५० हून अधिक वस्तूंवरील टॅक्स कमी करण्याचा प्रस्ताव. किराणा, कार, दुचाकी स्वस्त, तर महागड्या इलेक्ट्रिक वाहनांवर कर वाढणार.
सायली मेमाणे
पुणे ३ सप्टेंबर २०२५ : नवी दिल्लीमध्ये आजपासून जीएसटी परिषदेची दोन दिवसांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीत घेतले जाणारे निर्णय थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणार आहेत. किराणा सामानापासून ते कार, दुचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सध्या १२ टक्के आणि १८ टक्के जीएसटी असलेल्या काही वस्तू पाच टक्के किंवा शून्य टक्के स्लॅबमध्ये आणण्याचा विचार सुरू आहे.
सण-उत्सव काळात खरेदी स्वस्त व्हावी, या उद्देशाने परिषदेत मिठाई, पॅक्ड स्नॅक्स, चॉकलेट, आइसक्रीम, पेस्ट्री, सीरियल फ्लेक्स यांवरील कर १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याशिवाय पराठा, खाखरा, मशरूम, खजूर, ब्रेड, चपाती आणि रोटी यासारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरही करसवलत देण्याची शक्यता आहे.
डेअरी क्षेत्रात तूप, लोणी आणि चीज या वस्तूंना मोठा फायदा होईल असा अंदाज आहे. सध्या तुपाचा दर प्रतिलिटर सुमारे ७०० रुपये असल्याने सामान्य ग्राहक स्वस्त पर्यायांचा शोध घेतात. जर कर कमी झाले तर किंमती कमी होऊन खप वाढेल आणि त्यामुळे आयातीतून येणाऱ्या महागड्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल.
विद्यार्थ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. शालेय साहित्य जसे नकाशा, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर आणि वही यांवरील कर शून्य टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे पालकांवरील खर्चाचा ताण कमी होईल.
वाहन क्षेत्रातही मोठे बदल अपेक्षित आहेत. पॅसेंजर कार आणि दुचाकीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्याचा विचार सुरू आहे. यामुळे दिवाळीपूर्वी वाहन खरेदी करणे मध्यमवर्गीयांसाठी अधिक सोयीस्कर होईल. दुसरीकडे, महागड्या इलेक्ट्रिक गाड्यांवरील कर मात्र वाढवण्याचा प्रस्ताव आहे. २० ते ४० लाखांच्या दरम्यानच्या इलेक्ट्रिक गाड्यांवरील जीएसटी पाच टक्क्यांनी वाढवून १८ टक्क्यांवर नेण्यात येऊ शकतो, तर ४० लाखांहून अधिक किंमतीच्या गाड्यांवर २८ टक्के कर लागू करण्याचा विचार आहे. या निर्णयामुळे टेस्ला, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि बीवायडीसारख्या कंपन्यांना फटका बसू शकतो, तर टाटा आणि महिंद्रासारख्या तुलनेने परवडणाऱ्या ई-कार विकणाऱ्या कंपन्यांना मोठा परिणाम होणार नाही.
सरकार कर रचनेत मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. सध्याच्या चार कर स्लॅबऐवजी फक्त दोन स्लॅब म्हणजेच पाच टक्के आणि १८ टक्के असे ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, लक्झरी कार, एसयूव्ही आणि तंबाखूजन्य पदार्थांसाठी ४० टक्क्यांपर्यंत विशेष कर लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
लघु उद्योजक आणि स्टार्टअपसाठीही या बदलांचा फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे जीएसटी २.० मुळे व्यवसाय करणे सोपे होईल, अनुपालनाचा भार कमी होईल आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल.
या बैठकीत निर्णय घेण्यात आल्यानंतर नवे जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील. दिवाळीपूर्वी खरेदी स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. एकूणच, या परिषदेतील निर्णयांमुळे देशातील महागाईवर नियंत्रण येईल, खरेदीची सवय बदलेल आणि बचतीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.