GST Rate Cut: जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय, रोजच्या वापराच्या वस्तूंवर करकपात; जाणून घ्या संपूर्ण यादी

0
GST Rate Cut: जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय, रोजच्या वापराच्या वस्तूंवर करकपात; जाणून घ्या संपूर्ण यादी

GST Rate Cut: जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय, रोजच्या वापराच्या वस्तूंवर करकपात; जाणून घ्या संपूर्ण यादी

जीएसटी परिषदेच्या बैठकीत सरकारने 12% आणि 28% स्लॅब रद्द करून 5% आणि 18% असे दोन स्लॅब ठेवले आहेत. रोजच्या वापराच्या वस्तूंपासून ते वाहनांपर्यंत अनेक वस्तू स्वस्त होणार असून, दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सायली मेमाणे

पुणे ४ सप्टेंबर २०२५ : जीएसटी परिषदेच्या ऐतिहासिक बैठकीत घेतलेल्या मोठ्या निर्णयांमुळे सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने 12% आणि 28% या दोन स्लॅब रद्द करून 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल आणि लोकांना रोजच्या वापराच्या वस्तूंपासून ते वाहनांपर्यंतच्या खरेदीत बचत होईल. या ऐतिहासिक निर्णयाला सर्व राज्यांची सहमती मिळाली असून, यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि जनसामान्यांना परवडणारी होईल.

सरकारने सर्वात आधी रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी दर कमी केले आहेत. हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश आणि शेव्हिंग क्रीम यांसारख्या वस्तूंवर 18% ऐवजी 5% कर आकारला जाणार आहे. लोणी, तूप, चीज यांवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे. पॅकेटमधील नमकीन, भुजिया आणि मिक्सर यांसारख्या खाद्यपदार्थांवरील करदेखील 12% वरून 5% झाला आहे. लहान मुलांचे डायपर्स आणि फीडिंग बॉटल्सवर 12% वरून 5% इतकी कपात करण्यात आली आहे. याशिवाय शिलाई मशीन आणि त्याचे सुटे भाग आता 12% ऐवजी 5% दरात मिळणार आहेत.

आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित वस्तूंवरील करकपात सर्वसामान्यांसाठी दिलासा ठरणार आहे. हेल्थ इन्शुरन्स आता पूर्णपणे करमुक्त म्हणजेच 18% ऐवजी 0% दराने उपलब्ध होणार आहे. थर्मामीटरवर 18% वरून 5% आणि मेडिकल ग्रेड ऑक्सिजनवर 12% वरून 5% कर आकारला जाणार आहे. ग्लूकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्सवरील कर देखील 12% वरून 5% करण्यात आला आहे. शैक्षणिक साहित्यामध्ये नकाशे, चार्ट आणि ग्लोब हे आता पूर्णपणे करमुक्त होणार आहेत. पेन्सिल, शार्पनर आणि नोटबुक्सवर देखील 0% जीएसटी लागेल, तर रबरवर 5% ऐवजी 0% दर लागू होईल.

वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करणाऱ्यांसाठीही मोठी चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड कार तसेच सीएनजी कार (1200 सीसी आणि 400 एमएम पेक्षा कमी) यांवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे. डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार (1500 सीसी आणि 400 एमएम पेक्षा कमी), तीन चाकी वाहने, मोटरसायकल (350 सीसी खालील), एसी, मोठ्या स्क्रीनचे टीव्ही, एलईडी आणि एलसीडी स्क्रीन, मॉनिटर आणि प्रोजेक्टर यांवरील कर 28% ऐवजी 18% इतका कमी करण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रासाठीही हा निर्णय दिलासा देणारा आहे. ट्रॅक्टरचे टायर आणि सुटे भाग 18% ऐवजी 5% दराने मिळतील, तर ट्रॅक्टर स्वतः 12% वरून 5% दरात उपलब्ध होणार आहेत. बायो पेस्टिसाइड आणि सिंचन प्रणालीवरचा करदेखील 12% वरून 5% करण्यात आला आहे. याशिवाय सिमेंटवर 28% ऐवजी 18% जीएसटी लावण्यात आल्यामुळे घर खरेदी स्वस्त होईल आणि बांधकाम क्षेत्रालाही दिलासा मिळेल.

या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा मिळेल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवाळीपूर्वी हा निर्णय आल्याने नागरिकांना खरंच मोठी भेट मिळाल्याचं मानलं जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed