पुणे कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात पोलिसांचा मोठा छापा; १५० कर्मचारी, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल जप्त. अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवत पैसे उकळले जात होते.
सायली मेमाणे,
पुणे २४ मे २०२४ : पुणे कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकत सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईत १०० ते १५० कर्मचारी, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल फोन आणि महत्त्वाचा डेटा जप्त करण्यात आला आहे. या छाप्यामध्ये सध्या ५ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आणखी काहींवर चौकशी सुरू आहे.
ही कारवाई प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीतील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी या बनावट कॉल सेंटरवर करण्यात आली. या कॉल सेंटरवरून अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अटक’ची धमकी देत आर्थिक फसवणूक केली जात होती. या प्रकारात नागरिकांना कॉल करून त्यांना खोट्या कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकवले जात होते आणि नंतर पैसे उकळले जात होते.
या कॉल सेंटरमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी गुजरातमधील असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या १५० ते २०० अधिकाऱ्यांचा फौजफाटा या छाप्यासाठी तैनात करण्यात आला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू असलेले हे केंद्र अतिशय योजनाबद्धपणे चालवले जात होते.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या लॅपटॉप, मोबाईल, डेटा व दस्तऐवजांच्या आधारे अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फसवणूक साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण प्रकार सायबर गुन्हेगारीचा अत्यंत धोकादायक नमुना ठरतो.
प्राथमिक तपासानुसार, अमेरिकेतील नागरिकांकडून डॉलरमध्ये पैसे उकळले जात होते, आणि हे पैसे विविध फर्जी खात्यांमार्फत भारतात पाठवले जात होते. संबंधित व्यक्तींची चौकशी करून या फसवणूक जाळ्यातील इतर प्रमुख सूत्रधारांना गाठण्याचे काम सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे.