रिलायन्स डिफेन्स : रत्नागिरी जिल्ह्यात रिलायन्स डिफेन्स आणि जर्मन कंपनी राईनमेटल AG यांच्या भागीदारीत बॉम्ब व स्फोटकांची भव्य फॅक्टरी उभारली जाणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २४ मे २०२४ : Reliance Defence ने भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपनी रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीची जगप्रसिद्ध शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी राईनमेटल AG यांच्यात सामंजस्य करार झाल्यानंतर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वटड औद्योगिक क्षेत्रात स्फोटक आणि दारूगोळा उत्पादन करणाऱ्या भव्य फॅक्टरीची उभारणी केली जाणार आहे. या युनिटचे नाव ‘धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी’ असे ठेवण्यात आले असून, यात दरवर्षी दोन लाख तोफगोळे, १०,००० टन स्फोटके आणि २,००० टन उच्च क्षमतेचे प्रणोदक तयार करण्यात येणार आहेत.
या मेगा फॅक्टरीचा उद्देश केवळ भारतीय लष्कराच्या गरजा पूर्ण करणे एवढाच मर्यादित नाही, तर जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी भारताला सज्ज करणेही आहे. यामुळे भारताकडून संरक्षण क्षेत्रातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राईनमेटल AG ही कंपनी सध्या १७१ देशांमध्ये कार्यरत असून, २०२४ साली तिचे वार्षिक उत्पन्न ९.८ अब्ज युरोपर्यंत पोहोचले आहे. अशा आंतरराष्ट्रीय ख्यातकी कंपनीसोबत भारतीय कंपनीची भागीदारी होणे म्हणजे भारताच्या सामरिक स्वावलंबनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
Reliance Defence या उपक्रमामुळे ‘मेक इन इंडिया’ या केंद्र सरकारच्या अभियानाला नवीन बळ मिळणार असून, देशाच्या संरक्षण उत्पादन प्रणालीमध्ये मोठा आत्मनिर्भरतेचा टप्पा पार पडणार आहे. भारत बराच काळ संरक्षण सामग्रीच्या आयातीवर अवलंबून होता, पण अशा प्रकल्पांमुळे आता भारत शस्त्रास्त्र उत्पादनात आणि निर्यातीत देखील आघाडीवर जाऊ शकतो. यामुळे देशात नोकऱ्यांच्या संधी वाढतील, स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल आणि देशाची सामरिक शक्ती बळकट होईल.
हे ग्रीनफिल्ड युनिट आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे सुरक्षा निकष आणि शाश्वत विकास धोरणांच्या आधारावर उभारले जाणार आहे. देशांतर्गत कंपन्यांमध्ये आणि जागतिक उद्योगांमध्ये संरक्षण क्षेत्रात असे सहकार्य निर्माण होणे ही काळाची गरज होती. भारत आता केवळ मोठा ग्राहक नसून, एक शस्त्रास्त्र उत्पादक आणि निर्यातदार राष्ट्र म्हणून पुढे येतो आहे. हे सर्व शक्य झाले आहे Reliance Defence च्या पुढाकारामुळे.