• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

सी-60 कमांडोंना मोठे यश: मुसळधार पावसात 14 लाखांचे इनामी 4 हार्डकोर नक्षलवादी ठार

May 24, 2025
सी-60 कमांडोंना मोठे यश सी-60 कमांडोंना मोठे यश

सी-60 कमांडोंना मोठे यश: मुसळधार पावसात 14 लाखांचे इनामी 4 हार्डकोर नक्षलवादी ठार; एक दलम कमांडर आणि तीन सदस्यांचा समावेश
सायली मेमाणे,

पुणे २४ मे २०२४ : गडचिरोली, प्रतिनिधी – जिल्हा पोलिस विभागाच्या सी-60 कमांडोंनी शुक्रवारी सकाळी 7 वाजता मोठी कामगिरी केली. भामरागड तालुक्यातील कवंडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या इंद्रावती नदी परिसरात झालेल्या चकमकीत 4 हार्डकोर नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण 14 लाख रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. ठार झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून, यामध्ये एक नक्षल दलम कमांडर व तीन दलम सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 8 लाख रुपयांचे इनामी, भामरागड दलमचा कमांडर आणि कवंडे गावचा रहिवासी सन्नु मासा पुंगाटी (वय 35), 2 लाखांचे इनामी सदस्य अशोक उर्फ सुरेश पोरीया वड्डे (वय 38), पोड़िया (छत्तीसगड) येथील 2 लाखांची इनामी महिला सदस्य विंज्यो होयामी (वय 25), आणि गोंगवाडा येथील 2 लाखांची इनामी महिला सदस्य करूणा उर्फ ममिता उर्फ तुनी पांडू वरसे (वय 21) यांचा समावेश आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी (22 मे) कवंडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत, छत्तीसगड सीमेलगत इंद्रावती नदी परिसरात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-60 कमांडोंच्या 12 टीम्स आणि सीआरपीएफच्या 113 बटालियनच्या 1 टीमला मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.

गुरुवारी दुपारपासून जोरदार पाऊस सुरू असतानाही जवानांनी पायदळ शोधमोहीम राबवली. रात्री आराम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी परत मोहिमेला सुरूवात करण्यात आली. या वेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांच्या स्थानावर घेराव घालण्यात यश मिळवले. फक्त, या कालावधीत नक्षलवाद्यांनी अचानक बंदूक चालू केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीदेखील गोळीबार केला

चकमकीदरम्यान काही नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. हे सर्व भामरागड नक्षल दलमचे सदस्य असून, ते कोणत्यातरी मोठ्या कारवायेसाठी जमले होते. मात्र, पोलिसांच्या अचूक रणनीतीमुळे त्यांच्या योजना फसवण्यात यश आले आहे.

घटनास्थळी पोलिसांनी 1 एसएलआर रायफल, 2 303 रायफल, 1 भरमार बंदूक, वॉकी-टॉकीसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त केले आहे.