कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. भूसंपादन आणि वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे कामात सातत्याने विलंब होत आहे.
सायली मेमाणे,
पुणे २४ मे २०२४ : कात्रज चौकातील सहापदरी उड्डाणपुलाचे काम आणखी एकदा लांबण्याची चिन्हं आहेत. २४ सप्टेंबर २०२१ रोजी उद्घाटन झालेल्या या प्रकल्पाची सुरुवातीची मुदत फेब्रुवारी २०२४ होती. मात्र, भूसंपादन आणि वाहतूक कोंडीमुळे यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे आता पुलाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवले गेले आहे, तरी प्रत्यक्षात ते डिसेंबर २०२६ पर्यंत लांबण्याची शक्यता अधिक आहे. राजस सोसायटी चौकात पुलाच्या उतरणीसाठी लागणाऱ्या ११ जागांपैकी केवळ ७ जागा PMC ताब्यात घेऊ शकली आहे. उर्वरित जागांच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जागा मिळाल्यास सहा महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही १९ पैकी केवळ १० गाळ्यांचेच काम पूर्ण झाले असून, कात्रज चौकातील अवघड टप्पा पूर्ण झाला आहे. हा पूल एकूण १३२६ मीटर लांबीचा असून, सहा पदरी असेल आणि दोन्ही बाजूंना ७ मीटरच्या सर्व्हिस रस्त्यांसह बांधला जात आहे. केंद्र सरकारकडून १६९.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, नागरिकांकडून कामात गती आणण्याची मागणी वाढत आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.