बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पावर मध्यरात्री चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर गोळीबार; एक ठार, इतर आरोपी फरार. पोलिस तपास सुरू.
सायली मेमाणे,
पुणे २३ मे २०२४ : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश भागात एका पवनचक्की प्रकल्पाजवळ चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांवर सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, इतर संशयित फरार झाले आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता घडली.
माहितीनुसार, चोरट्यांनी प्रकल्पाच्या परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप समजलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पवनचक्की प्रकल्पामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत या प्रकल्पाजवळ अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत ज्यात चोरी, वादविवाद आणि इतर गुन्हे समाविष्ट आहेत. प्रशासनाने या घटना गांभीर्याने घेतल्या असून पुढील सुरक्षा उपाययोजना करण्याची तयारी दर्शवली आहे.