• Fri. Jul 25th, 2025

NewsDotz

मराठी

गणेशोत्सवात मुंबई–कोकण जल परिवहन सेवा सुरू

May 23, 2025
मुंबई कोकण जल परिवहन सेवामुंबई कोकण जल परिवहन सेवा

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईहून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत जल परिवहन सेवा सुरू होणार असून प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.
सायली मेमाणे,

पुणे २३ मे २०२४ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईहून थेट कोकणात जलमार्गे जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. या निर्णयामुळे कोकणातील मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत केवळ साडेचार ते तीन तासांत पोहोचता येणार आहे. ही जल सेवा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना वेळ, वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून दिलासा देणारी ठरणार आहे.

सध्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाण्याकरिता चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यांची खराब अवस्था, अव्यवस्थित वाहतूक, वाहने अपुरी पडणे आणि वेळेचा अपव्यय या समस्या वारंवार येत असतात. त्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉकहून रत्नागिरी, मालवण आणि विजयदुर्गपर्यंत जलमार्गे प्रवासाचा नवा पर्याय उभा राहणार आहे. एम टू एम नावांद्वारे ही जलसेवा पुरवली जाणार असून त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत.

या जलसेवेचे उद्‍घाटन २५ मे रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथे होणार आहे. ही सेवा आरंभीच्या टप्प्यात सुरू केली जाणार असून त्यासाठी प्रवासाचे दर स्वस्त व परवडणारे असतील, असे संकेत दिले गेले आहेत. मुंबईहून साडेचार तासांत मालवण व विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून कोकणातील गणपती दर्शनासाठी अधिक लोक पोहोचू शकतील.

फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात चाकरमान्यांची गर्दी नियोजनबद्धपणे हाताळता येईल. तसेच, जलमार्गावरील प्रवासामुळे रस्त्यावरील ताण कमी होईल आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेस चालना मिळेल. ही जलसेवा भविष्यात अधिक मार्गांवरही सुरू करण्याची शक्यता आहे.