• Fri. Jul 25th, 2025

NewsDotz

मराठी

भिलारेवाडी तलावातून पुणेकरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पर्याय

May 23, 2025
भिलारेवाडी तलावातून पुणेकरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पर्यायभिलारेवाडी तलावातून पुणेकरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पर्याय

पुण्यातील पाण्याच्या वाढत्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भिलारेवाडी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा महापालिकेचा विचार सुरू असून, डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे.
सायली मेमाणे,

पुणे २३ मे २०२४ : पुणे शहरात कात्रज, कोंढवा परिसरात वाढत्या पाणीटंचाईमुळे पर्यायी स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भिलारेवाडी तलावाचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होऊ शकतो का, याची चाचपणी महापालिका करत आहे. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी उंची वाढविण्याचे नियोजन असून, त्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहराची हद्दवाढ झाल्यानंतर समाविष्ट झालेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा करणे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. कात्रज, कोंढवा, आंबेगाव, जांभूळवाडी, भिलारेवाडी, धनकवडी यांसारख्या भागांना सध्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, नव्या बांधकामांमुळे लोकसंख्या वेगाने वाढत असून, येत्या काही वर्षांत या भागात गंभीर पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.

कात्रज घाटाच्या पायथ्याला वसलेला भिलारेवाडी तलाव सध्या १६ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा धारण करू शकतो. मात्र, या तलावातील पाण्याचा सध्या पिण्यासाठी वापर केला जात नाही. याचे पाणलोट क्षेत्र हे वन विभागाच्या हद्दीत असल्याने भविष्यात तेथे बांधकाम होणार नाही आणि त्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता कमी आहे. २०१९ मध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या तलावाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा जलसंधारण विभागाने तलावाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सहा वर्षांनंतरही फारशी प्रगती झालेली नव्हती.

भिलारेवाडी गाव महापालिकेच्या हद्दीत आल्याने प्रशांत गोरे या अभियंत्यांनी या मुद्द्याचा पाठपुरावा केला असून, महापालिकेने त्याची दखल घेत डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हे जलस्रोत पर्याय म्हणून वापरल्यास पुणेकरांवरील पाण्याचा ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. या परिसरात आणखी एक तलाव असून, त्याचेही समांतर नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.