पुण्यात बुधवारी 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या पावसाने मागील 10 वर्षांचा मे महिन्यातील विक्रम मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ही पूर्वमोसमी स्थिती असून अजून काही दिवस पाऊस कायम राहणार आहे.
सायली मेमाणे,
पुणे २३ मे २०२४ : पुण्यात 103 मिलिमीटर पावसाची नोंद बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात झाली. हा पाऊस गेल्या 10 वर्षांतील मे महिन्यातील सर्वाधिक असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. याआधी २०१५ मध्ये शिवाजीनगर परिसरात १०२.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदाचा पूर्वमोसमी पाऊस अधिक तीव्र ठरून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
मे महिना म्हणजे सामान्यतः पुण्यातील तापदायक हवामानाचा कालखंड. उन्हाच्या तीव्र झळा, उष्माघाताचा धोका आणि वाऱ्याचा अभाव या काळात हमखास जाणवतो. पण यंदा निसर्ग चक्रात बदल झाला असून, ऐन मे महिन्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि दमदार पावसाने पुणेकरांना आश्चर्यचकित केले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुण्यात २२ मे पर्यंत झालेला पाऊस सामान्य पातळीपेक्षा लक्षणीय अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी पडत असून, याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रावर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि त्यामार्फत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आलेली आर्द्रता.
हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, दक्षिण कोकण आणि गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रावर तयार झालेलं हे कमी दाबाचं क्षेत्र सध्या स्थिर असून त्याचा परिणाम म्हणून मे महिन्यात शहरात अशा प्रकारचा विक्रमी पाऊस झाला आहे.
पूर्वमोसमी हवामान स्थितीमुळे पावसाची तीव्रता अजून काही दिवस टिकून राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे.
पूर्वी साधारणतः ७ जूनच्या सुमारास मॉन्सून पुण्यात दाखल होतो. परंतु यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की यंदाचा पाऊस वेळेपूर्वी दाखल होणार का?
पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचल्याची आणि वाहतूक विस्कळीत झाल्याचीही नोंद झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यातील उष्म्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांसाठी हा पाऊस काहीसा दिलासादायक असला तरी पायाभूत सुविधांवरील ताण पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.