पीएमपी चे नवे नियोजन प्रवाशांच्या लिंगानुसार संकलित केलेल्या माहितीवर आधारित असून, बससेवा अधिक परिणामकारक बनवण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
सायली मेमाणे,
पुणे २३ मे २०२४ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलने आपल्या सेवा व्यवस्थापनामध्ये मोठा बदल करत पहिल्यांदाच प्रवाशांच्या लिंगानुसार नोंदी घेतल्या आहेत. याआधी पीएमपी बसमधून होणाऱ्या प्रवासाचा डेटा प्रवाशांच्या एकूण संख्येवर आधारित होता. मात्र एप्रिल २०२५ पासून बस वाहकांना प्रत्येक प्रवाशाचे लिंग – स्त्री, पुरुष, मुलगा किंवा मुलगी – मशीनमध्ये नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या पीएमपीच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सुमारे ५६ टक्के प्रवासी पुरुष असून, ४४ टक्के महिला प्रवासी आहेत. ही माहिती प्रशासनाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
सध्या पीएमपीएमएल पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील एकूण ३८१ मार्गांवर बस सेवा पुरवते. यासाठी दररोज १७०० हून अधिक बस रस्त्यावर धावत असतात. यामधून सरासरी आठ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. यापूर्वी प्रशासनाकडे कोणत्या मार्गांवर कोणत्या लिंगाचे प्रवासी अधिक आहेत, याबाबत ठोस माहिती नव्हती. परंतु आता, नव्या ई-तिकीट प्रणालीमुळे ही माहिती थेट प्रणालीत उपलब्ध होत आहे. यामुळे महिला प्रवासी जास्त असलेल्या मार्गांवर बस संख्येत वाढ, वेळापत्रकात बदल किंवा विशेष महिला सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. याशिवाय गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्येही ही माहिती उपयुक्त ठरेल.
२०१०-२०११ मध्ये ई-तिकीट यंत्रणा सुरू केल्यामुळे तिकीट विक्री, उत्पन्न आणि प्रवासी संख्येचा ट्रॅक ठेवणे शक्य झाले होते. पुढे २०२३ मध्ये यूपीआयद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध झाली. क्यूआर कोड प्रणालीने प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ केली. एप्रिल २०२५ पासून लिंग आधारित नोंद अनिवार्य केल्यामुळे आता प्रशासनाकडे प्रत्येक मार्गाचा तपशीलवार डेटा जमा होतो आहे. सध्या या आकडेवारीचा अभ्यास सुरू असून, त्यानुसार सेवा सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले की, ही प्रणाली सार्वजनिक वाहतुकीचे स्वरूप बदलवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. लिंगानुसार प्रवाशांची संख्या समजल्यामुळे धोरण आखणी अधिक प्रभावी होईल आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देता येईल. ही योजना भविष्यातील स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिमचा भाग ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.