डॉ. अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणात अडकले; रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल होणार. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात कारागृहात आहेत.
सायली मेमाणे,
पुणे २४ मे २०२४ : बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. अजय तावरे यांच्याविरोधात आणखी एक गंभीर आरोप उभा राहिला आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना या प्रकरणात सहआरोपी म्हणून ताब्यात घेतले जाणार आहे.
किडनी रॅकेट प्रकरणात आधीच १५ जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात रुग्ण, दाते, एजंट, खासगी रुग्णालयातील अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. आता त्यात तावरे यांचेही नाव अधिकृतपणे जोडले जात आहे. या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात तावरे यांचा सहभाग स्पष्ट करण्यात आला होता. मात्र, सुरुवातीच्या तक्रारीत त्यांचे नाव टाळले गेले होते.
पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची फाईल पुन्हा उघडून समितीचा अहवाल अभ्यासल्यावर यामध्ये तावरे यांची निर्णायक भूमिका असल्याचे निदर्शनास आले. किडनी देणारा आणि घेणारा व्यक्ती बनावट असल्याचे माहिती असूनही त्यांनी दोघांची वैधता दर्शवणाऱ्या मुलाखती घेतल्या, आणि खोट्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब केले. प्रत्यारोपणासाठी गठित समितीचे ते अध्यक्ष होते आणि तिच्या कामकाजावर त्यांचे थेट नियंत्रण होते.
या व्यवहारात पैसे देण्याचा तोंडी करार फसल्यामुळे डोनर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली आणि रॅकेटचा पर्दाफाश झाला. दरम्यान, किडनी देणाऱ्या महिलेच्या नातेवाइकांनी ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे दिले गेल्याचा आरोप केला होता. यावरून संशय बळावला आणि खऱ्या घडामोडींचा तपास सुरू झाला.
सध्या अजय तावरे पोर्शे अपघात प्रकरणात कारागृहात असल्याने, त्यांना या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलिस प्रक्रिया सुरू करत आहेत. किडनी रॅकेटसारख्या गंभीर गैरव्यवहारात वरिष्ठ सरकारी डॉक्टरची भूमिका असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.