Lalbaugcha Raja 2025 : व्हीआयपी दर्शनावर ओंकार शिंदेचा संताप, इन्फ्लुएन्सर्सवर टीका
Lalbaugcha Raja 2025 : व्हीआयपी दर्शनावर ओंकार शिंदेचा संताप, इन्फ्लुएन्सर्सवर टीका
लालबागचा राजा 2025 दर्शनावर व्हीआयपी वागणूक दिल्याबद्दल कॉन्टेन्ट क्रिएटर ओंकार शिंदेने अंजली अरोरा, सनी लिओनी यांच्या व्हिडिओवरून संताप व्यक्त केला.
सायली मेमाणे
मुंबई, ४ सप्टेंबर – मुंबईतील लालबागचा राजा हा देशातीलच नव्हे तर जगभरातल्या भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. प्रत्येकवर्षी लाखो भक्त तासंतास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतात. परंतु गेल्या काही वर्षांत सामान्य भक्त आणि व्हीआयपी पाहुण्यांच्या दर्शनात होणारा भेदभाव हा वादग्रस्त विषय ठरत आहे. यंदाही याच मुद्यावरून सोशल मीडियावर संताप उसळला असून प्रसिद्ध कॉन्टेन्ट क्रिएटर ओंकार शिंदे याने आपल्या व्हिडिओद्वारे याबाबत परखड मत मांडले आहे.
ओंकार शिंदेने आपल्या व्हिडिओत थेट इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा आणि अभिनेत्री सनी लिओनी यांच्या क्लिप दाखवत संताप व्यक्त केला. या दोघींना लालबागच्या राजाचे थेट दर्शन मिळाल्याचे व्हिडिओ दाखवत त्याने प्रश्न विचारला की, “सामान्य भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते आणि एका पायाचेही दर्शन मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षक मायक्रो सेकंदात ढकलून पुढे पाठवतात. पण सेलिब्रिटींना आरामात दर्शनासोबत फोटो काढण्याचीही संधी मिळते, हे योग्य आहे का?”
यावर पुढे बोलताना त्याने तिखट भाषेत म्हटले की, अजून मिया खलिफा आणि जॉनी सिंस यांनाही बोलावून द्या. कारण ज्यांना आपल्या संस्कृतीशी वा देवाशी काहीही देणंघेणं नाही, ते केवळ प्रसिद्धीसाठी येतात आणि त्यांना व्हीआयपी दर्शन दिले जाते. पण जे भक्त दरवर्षी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लालबागला गर्दी करतात, त्यांना काही सेकंदातच पुढे ढकललं जातं.
अंजली अरोराच्या कॉन्टेन्टवर देखील त्याने आक्षेप घेतला आणि तिच्यासारख्या इन्फ्लुएन्सरला व्हीआयपी दर्शन कसे मिळते, असा सवाल केला. तर सनी लिओनीच्या सुरुवातीच्या करिअरची आठवण करून देत, ती केवळ इमेज बदलण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी गणपतीच्या दर्शनाला येते, असा दावा ओंकारने केला.
ओंकार शिंदे म्हणाला की, हा दोष मंडळांचा कमी आणि लोकांचा जास्त आहे. आपण कोणाला प्रसिद्ध करतो, कोणाला मोठे करतो आणि कोणाला फॉलो करतो, यावरच सगळं अवलंबून आहे. आपली निवडच चुकीची असल्याने असे प्रसंग घडतात आणि त्याचा त्रास शेवटी आपल्यालाच सहन करावा लागतो. “आपण त्याच लायकीचे आहोत” असे म्हणत त्याने या चर्चेला वेगळा रंग दिला.
या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी ओंकारच्या परखड मतांचे कौतुक केले असून, सामान्य भक्तांवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी केली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी लाखोंची गर्दी होत असल्याने सुरक्षा व्यवस्था आव्हानात्मक असते. पण त्याच वेळी सेलिब्रिटींना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीमुळे सामान्य भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
लालबागचा राजा हा सर्वांचा आहे आणि त्याच्या दर्शनात कोणताही भेदभाव होऊ नये, अशी अपेक्षा अनेक भक्तांनी व्यक्त केली आहे. या वादानंतर मंडळाकडून काही स्पष्टीकरण दिले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.