गोकुळ दूध संघाच्या सभेला शांततेत सुरुवात, विरोधी गटही सहभागी
गोकुळ दूध संघाच्या सभेला शांततेत सुरुवात, विरोधी गटही सहभागी
गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेला यंदा शांततेत सुरुवात झाली. विरोधी गटातील शौमिका महाडिक यांनी सभासदांमध्ये बसून सहभाग नोंदवला. मंत्री हसून मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील यांचीही उपस्थिती होती.
सायली मेमाणे
पुणे ९ सप्टेंबर २०२५ : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा गोकुळ दूध संघाचा वार्षिक सर्वसाधारण सभेला यंदा शांततेत सुरुवात झाली. दरवर्षी या सभेच्या प्रारंभी वाद, गोंधळ आणि घोषणाबाजी होत असते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असून सुरुवातीपासूनच सभेत शांतता होती. त्यामुळे सभासद आणि पाहुणे यांच्यात एक वेगळा संदेश गेला आहे.
विरोधी गटातील संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांमध्ये बसून सहभाग नोंदवला. यामुळे सभेचे वातावरण अधिक शांततामय झाले. याशिवाय या सभेला मंत्री हसून मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार के. पी. पाटील हे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे सभेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.
सभेची सुरुवात झाल्यानंतर लगेचच ठराव मांडण्यास प्रारंभ झाला. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायासाठी आधारस्तंभ मानला जातो. त्यामुळे या सभेत होणारे निर्णय हे हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असतात. शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरापासून ते संघाच्या आर्थिक नियोजनापर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे या सभेत चर्चिले जाण्याची अपेक्षा आहे.
सभेतील शांततेमुळे यंदा विधायक चर्चेला वाव मिळणार असल्याचे चित्र दिसून आले. गेल्या काही वर्षांपासून गोकुळ दूध संघाच्या सभांना राजकीय रंग चढलेला दिसत होता. विरोधी आणि सत्ताधारी गटातील संघर्ष सभेच्या वातावरणावर प्रभाव टाकत होता. मात्र, यंदा सुरुवातीच्या शांततेमुळे सभासद आणि उपस्थित नेत्यांना कामकाज सुरळीत पार पाडण्याची संधी मिळाली आहे.
गोकुळ दूध संघ हे केवळ एक सहकारी संस्था नसून, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक कणा आहे. त्यामुळे सभेत मांडले जाणारे ठराव हे केवळ संघापुरते मर्यादित नसून संपूर्ण शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचे मानले जातात. यंदाची सभा शांततेत पार पडत असल्यामुळे संघाच्या कारभारावर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.